पुणे (सासवड) : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची,,,ईडा पिडा टळूदे विमानतळ जळू दे,,, अशा घोषणा देत प्राण गेला तरी बेहत्तर पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही. जर शासनाला आमची जमीन जबरदस्तीने घ्यायची असेल तर आमचे रक्त सांडावे लागेल असा इशारा पुरंदर मधील शेतकऱ्यांनी शासनाला दिला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी नकाशा जाळून आपला तीव्र निषेध व्यक्त केला, त्यामुळे नजीकच्या काळात विमानतळ विरोधात शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण या सात गावांमधील २८३२ हेक्टर वरती शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. तसेच शासनाने बहुतेक सर्वच परवानग्या मिळविल्या असून मागील आठवड्यात प्रत्येक गावांमधील कोणकोणत्या दिशेचे क्षेत्र जाणार आहे त्यांचा नकाशा प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे आमच्याबरोबर शासनाने कोणतीही चर्चा न करता गट नंबर व नकाशा प्रसिद्ध केलाच कसा ? असा प्रश्न उपस्थित करून तहसिलदार कचेरी वर मोर्चा काढून तहसिलदार अतुल म्हेत्रे यांना निवेदन देवून शासनाचा जोरदार निषेध केला आहे. छत्रपती संभाजीराजे आंतराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदर येथे करणार असल्याचे मागील तीन वर्षांपासून शासनाकडून सांगितले जात आहे. मात्र वृत्त पत्रा मधून वृत्त येते या व्यतिरिक्त प्रत्यक्ष रित्या या संभाव्य जागेत येणाऱ्या गावामध्ये शासनाच्या वतीने काहीच चर्चा, काम अथवा नियोजन शासनाकडून झाले नाही .या शासनाच्या फसव्या कृतीचा दखल घेत शेतकऱ्यांनी विमानतळ विरोधा साठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. दि.२४ मे रोजी शासनाच्या वतीने विमानतळ बाबत नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती. त्या मध्ये शेतकऱ्यांना विमानतळा बाबत हरकत घ्यायची असल्यास नोटीस प्रसिध्द झाले पासून पुढील ६० दिवस कालावधी देण्यात आला आहे, आणि विमानतळ बाधित क्षेत्राचा नकाशा हा शासकीय कार्यालयामधे उपलब्ध असेल असे त्या मध्ये नमूद केले होते .मात्र नोटीस प्रसिध्द होऊन सतरा दिवस उलटले तरी अद्याप नकाशा मात्र शेतकऱ्यांना पाहायला पुरंदर तहसील येथे उपलब्ध झाला नाही, त्यामुळे विमानतळा बाबत शेतकऱ्यांचा तर कायम विरोध आहेच मात्र शासन देखील उदासीन वाटत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. विमानतळ पुरंदरला व हरकती नोंदविण्यास मुंबईला असे चित्र आहे. प्रशासनाच्या या कृतीचा निषेध करून हरकती देखील तहसिलदार पुरंदर येथे घेणेस शासनाने अंमलबजावणी करावी. नकाशा तहसिलदार पुरंदर यांचे कार्यालयात पाहण्यास उपलब्ध करावा, अशी मागणी विमानतळ विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आली. दत्तात्रय झुरंगे (अध्यक्ष विमानतळ विरोधी जन संघर्ष समिती)शेतकऱ्यांना जाहीर नोटीस द्वारे हरकत घेण्यासाठी साठ दिवसांचा कालावधी दिला मात्र याबाबत शेतकऱ्यांना कल्पना नाही, प्रशासकीय पातळीवर देखील नकाशा शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला नाही , शासन जाणून बुजून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. सर्व विमानतळ बाधित शेतकरी या साठ दिवसाच्या कालावधीत विमानतळास विरोध म्हणून प्रशासकीय पातळीवर हरकती नोंदवणार आहेत.
विमानतळ उभारण्यासाठी आमचे रक्त सांडावे लागेल : पुरंदरमधील शेतकऱ्यांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 7:01 PM