७/१२ उताऱ्यांवर पिकांच्या नोंदी करताना अनेक वेळा शेतातील पिके व उताऱ्यातील नोंदीमध्ये तफावत राहत होती. तसेच अंतर पिकांच्या नोंदी केल्या जात नसायच्या. त्यामुळे पीकविमा किंवा नुकसानभरपाई पंचनामे करताना अनेक अडचणी येत होत्या. महसूल विभागाकडून येत्या १५ ऑगस्टपासून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी ॲप लोकार्पण करीत आहे. त्याचा प्रचार व प्रसार प्रसिद्धीसाठी पांगारे येथे प्रायोगिक तत्त्वावर पीक पाहणी ॲपचा वापर कसा करायचा यासाठी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन प्रात्यक्षिक देण्यात आले. महसूल विभागाने या आधी शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन उतारे, ई-फेरफार, प्रॉपर्टी कार्ड आदी सेवा यशस्वीरीत्या ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत.
कृषी विभागाचा पीक पाहणी अहवाल व तलाठी कार्यालयातील पिकांच्या नोंदी यामधील तफावत दूर होणार असून पीकविमा किंवा नुकसानभरपाई मिळताना या पीक पाहणी ॲपचा उपयोग होणार आहे. नुकसानग्रस्त भागातील पिकांची आकडेवारी काढणे सोपे जाणार असल्याचे परिंचे कृषी मंडल अधिकारी संजय फडतरे यांनी सांगितले.
या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या ठिबक, तुषार व पाट पाण्यासारख्या सिंचनाच्या सुविधांच्या नोंदी करायच्या आहेत. मुख्य पिकांबरोबरच आंतरपिकांच्या नोंदी करता येणार आहेत. फळबागा व बांधावरील फळ झाडांच्या नोंदी तसेच विहीर व जनावरांच्या गोठ्याच्या नोंदी करायच्या आहेत. एका मोबाईलवरून साधारणपणे वीस गटाच्या नोंदी करता येणार असून, गावपातळीवर अँड्रॉइड फोन वापरणारे तरूण तसेच शेतकरी कुटुंबातील महिलांना माहिती देऊन या ॲपविषयी साक्षरता करणार असल्याचे स्वप्नाली चौंडकर यांनी सांगितले. मीना शेलार,संगीता शेलार,मोनिका शेलार,उमेश शेलार,दत्ता शेलार,रामराव शेलार,महादेव शेलार,भरत शेलार,दत्ता पिसाळ,प्रवीण शेलार,नितीन शेलार,
कृषी मित्र सचिन शेलार उपस्थित होते
पांगारे (ता. पुरंदर) येथे बांधावर जाऊन शेतकऱ्यांना पीक पाहणी ॲपचा वापर शिकवताना कृषी सहायक स्वप्नाली चौंडकर.