लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील शेतीसाठी जुना मुठा उजवा कालवा वरदान ठरला आहे. हवेलीमधून हा कालवा दौंड तालुक्यात जात आहे. मात्र या भागातील पाटकरी वितरिकेच्या पाटातून पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांकडून आर्थिक रक्कम लुटत असल्याचा गंभीर आरोप पूर्व हवेलीतील शेतकरी करीत आहेत. जेवणावळीचा आस्वाद मिळाल्याशिवाय पाटकरी पाणी देत नसल्यामुळे अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे.संबंधित पाटकरी दौंड तालुक्यामध्ये पाणी पोहोचत नसल्याचे कारण पुढे करून कुंजीरवाडी, नायगाव व प्रयागधाम फाटा येथील पाण्याचे पाट बंद करीत आहेत. या पाटातून संबंधित गावातील वाड्या-वस्त्यांवरील शेताला पाणी पोहोचत असल्याने या ठिकाणी पाणीपातळी टिकून राहते. मात्र येथील पाटकऱ्याच्या मनमानीला व हॉटेलातील जेवणावळीला शेतकरी वैतागले आहेत. ज्या शेतकऱ्याकडून आर्थिक लाभ होतो व त्याच्या ओल्या-सुक्या पार्टीची बडदास्त ठेवली जाते, अशाच शेतकऱ्यांसाठी पाटकरी रात्रीचे पाणी सोडतात.उन्हाचा पारा चढल्याने उन्हाळ्यात पाण्यावाचून पिके जळून जाऊ नयेत व आपले आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून शेतकरी पाणी मिळण्यासाठी पाटकऱ्याकडे विनवणी करीत आहे. मात्र पाटकरी या भागात आपला रात्रीस खेळ दाखवून आर्थिक मलई लाटत आहेत. यातील काही हिस्सा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही जात असल्याने पाटकऱ्यावर कोणाचाही अंकुश नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सोरतापवाडी, नायगाव व कोरेगाव मूळ येथील आर्थिक हित जोपासणाऱ्या काही शेतकऱ्यांना पाटकरी रात्रीच्या वेळी पाणी देत असतो. मात्र ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, अशा शेतकऱ्यांचे पाणी अडवले जात असल्याने त्यांना ते मिळत नाही. एकूणच या प्रक्रियेमध्ये पाटकऱ्याची बडदास्त वाढली असून शेतकरी मात्र पाटकऱ्यापुढे हतबल झालेले दिसत आहेत. (वार्ताहर)मी नव्यानेच पदभार स्वीकारला असल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेत आहोत. संबंधित पाटकऱ्याने आर्थिक हित जपण्यासाठी काही गैरप्रकार केला असल्यास कारवाई करण्यासंदर्भात अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला जाईल.- शशिकांत काळे, शाखाधिकारी, उरुळी कांचन, पाटबंधारे विभाग हवेलीच्या पूर्व भागामध्ये कालव्यामध्ये जास्त झालेले पाणी शेतकऱ्यांना संबंधित पाटकरी देत असतील. शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी त्वरित वरिष्ठ कार्यालयात संपर्क साधावा.- सचिन पवार, सहायक अभियंता पाटबंधारे विभाग, यवत
पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांची लूट?
By admin | Published: April 30, 2017 4:57 AM