पुणे : केवळ एक हजार रुपये नोंदणी शुल्क आणि एक हजार रुपयांच्या मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीच्या मालकीची हक्काची अदलाबदल करण्याची संधी सलोखा योजनेद्वारे देण्यात आली असून राज्यात आतापर्यंत ३३४ दस्तांची नोंद करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या तब्बल २ कोटी ८८ लाख रुपयांच्या नोंदणी व मुद्रांक शुल्काची बचत झाली आहे. सर्वाधिक नोंदणी अमरावती विभागात १०७ दस्तांची नोंद झाली आहे.
जमीन हा महत्त्वाचा व संवेदनशील विषय आहे. जमिनीच्या वादामुळे नात्यांमध्ये दुराव्याची भावना निर्माण होत असते. या वादामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले आहे. हे टाळण्यासाठी व आपापसांत सलोखा निर्माण करण्यासाठी ही योजना महसूल विभागाने राबवली आह़े पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षांपासून असला पाहिजे. एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी व ताबा असल्याबाबतचा वस्तूस्थितीदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी विहीत पंचनामा नोंदवहीमध्ये करणे आवश्यक राहील.
राज्य सरकारने ३ जानेवारीला अधिसूचना काढून ही योजना लागू केली होती. यामध्ये बाधित शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली असून केवळ १ हजार रुपये मुद्रांक शुल्क तर नोंदणी शुल्कदेखील १ हजार रुपये असे दोन हजार रुपये आकारले जातात. या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र शेतकरी कमीत कमी १२ वर्षांपासून बाधित असला पाहिजे. तसेच दस्तामध्ये अधिकार अभिलेखातील सर्वसमावेशक शेरे, क्षेत्र, भोगवटादार वर्ग, सत्ताप्रकार, पुनर्वसन, आदिवासी, कूळ आदी बाबी विचारात घेऊन दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवीत आहे, अशी अट दस्त करताना घालण्यात आली आहे.
३१ ऑगस्पटर्यंत राज्यात ३३४ दस्त
या योजनेंतर्गत राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत ३३४ दस्तांची नोंदणी झाली आहे. प्रत्येकी ३ लाख ३४ हजार रुपये मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क नागरिकांना भरावे लागले असून, या ३३४ दस्तांसाठी मुद्रांक शुल्कात २ कोटी ४८ लाख १७ हजार १२२ रुपये तर नोंदणी शुल्कात ४० लाख ३२ हजार ६७९ रुपये माफी मिळाली आहे.