शेलपिंपळगाव : ‘‘शेती क्षेत्रात बळीराजा हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांची प्रगती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सेंद्रिय शेती पिकवली पाहिजे. ज्यामुळे पिकविणाऱ्यांसोबत खाणाऱ्यांचेही आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन पिकविलेला शेतमाल हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवा,’ असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले आहे.
वडगाव घेनंद (ता. खेड) येथे मुख्यमंत्र्यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित स्वामी समर्थ सेंद्रिय गटाच्या माध्यमातून संतशिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या दीपाली काळे, माजी सभापती रमेश पवार, सरपंच शशिकला घेनंद, उपसरपंच उज्वला घेनंद, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, मृदा शास्रज्ञ डॉ. सी.आर पालवे, कीड रोग शास्रज्ञ डॉ. रवींद्र कारंडे, उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, खेड तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, मंडळ कृषी अधिकारी श्रीकांत राखुंडे आदिंसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, आजी - माजी पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आत्मा प्रकल्प संचालक साबळे म्हणाले, शेतकरी ते ग्राहक थेट माल विक्री केल्याने शेतकऱ्याला जास्त नफा होतो. ग्राहकाला ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलबध होतील. शेतकरी व शेतकरी गट थेट ग्राहकापर्यंत जोडण्यात येतील. विभागीय कृषी सहसंचालक बिराजदार म्हणाले, शेतमालाचे ग्रेडींग केल्यास गावतील गटामार्फत शेतमालाची विक्री होईल शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळेल. शेतमालावर प्रक्रिया केली पाहिजे. शेतकरी गटांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा. गटाला कर्जपुरवठा कमी व्याजदरात भेटतो त्याचा फायदा घेऊन गट बळकटीकरण करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहायक मंगेश किर्वे, जयश्री पाडेकर तसेच चाकण मंडल कार्यालयातील कर्मचारी वर्गाने केले. सूत्रसंचालन ज्योती राक्षे यांनी तर वडगाव ग्रामस्थांनी आभार मानले.
फोटो ओळ : वडगाव - घेनंद (ता. खेड) येथे 'विकेल ते पिकेल' योजनेअंतर्गत रयत बाजाराचा शुभारंभ करताना जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे.(छाया : भानुदास पऱ्हाड)