शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- अजित पवार

By नितीन चौधरी | Updated: April 22, 2025 12:31 IST2025-04-22T12:30:38+5:302025-04-22T12:31:30+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही, जिल्ह्याच्या पाच वर्षांच्या शेती आराखड्याचे विमोजन 

Farmers should not get discouraged, the government will not leave farmers in the lurch - Ajit Pawar | शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- अजित पवार

शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- अजित पवार

पुणे : “शेतीला व्यवसायाचा दर्जा देण्याचा प्रयत्न असून, आर्थिक स्वावलंबन साधण्यासाठी धोरण आखले जात आहे. शेतकऱ्यांच्या मनात यापुढे आत्महत्येची भावना येणार नाही, असे काम करायचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, नाउमेद होऊ नये. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागातर्फे दिशा कृषी उन्नतीची या जिल्ह्यातील शेतीच्या पाच वर्षांच्या आराखड्याच्या विमोचनप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार बापू पठारे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, कृषी संचालक रफीक नाईकवाडी, राज्य शिखर बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, मराठा चेंबरचे महासंचालक प्रशांत गिरबने, बँक ऑफ महाराष्ट्राचे देवदत्त रोकडे, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्सचे राजन राजे, चेतन डेडिया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपस्थित होते. 

पवार म्हणाले, “जिल्ह्याचा शेतीचा पाच वर्षांचा आराखडा आखण्यात येत आहे. केवळ लक्ष्यांक आणि आकड्यांवर यात भर नसून, जिल्ह्याच्या कृषीची बलस्थाने आणि उणिवा यावर काय करता येईल तसेच याला वैज्ञानिक आणि व्यावहारिक जोड कशी देता येईल हे या आराखड्यात मांडण्यात आले आहे. त्यासाठी निधीची उपलब्धतादेखील करून दिली जाईल. मात्र, हा निधी त्याच कामासाठी वापरावा. शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पादकता वाढविण्याची गरज आहे. तसेच त्याचा उत्पादन खर्च कमी करावा लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान हवामानासह बाजारपेठेची साथ देणे गरजेचे आहे. केवळ उत्पादन करून चालणार नसून, बाजारपेठही उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे.”

आपल्या भाषणात पवार यांनी खरीप पीक विमा योजनेबाबत भाष्य केले. एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिल्यानंतर अनेक बनावट अर्जदारांनी अक्षरशः चुना लावला. त्यामुळे आता याबाबत नव्याने विचार केला जात असून, मुख्यमंत्री तसेच कृषिमंत्री यांची एकत्रित बैठक झाली असून त्यात शेतकऱ्यांना चांगला कार्यक्रम देऊ, असे आश्वासन पवारांनी यावेळी दिले. हा कार्यक्रम नेमका कसा असेल याबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ, त्यांना अंधारात ठेवणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

कोकाटे म्हणाले की, मी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या सूचना लक्षात घेता शेतीसाठी नवीन धोरण तयार करण्याचे विचारात आहे. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्नवाढीची जबाबदारी कृषी विभागाची असून, शेतकऱ्यांनी नैसर्गिक सेंद्रिय शेतीतून चांगले उत्पादन काढल्यास त्याच्या निर्यातीलाही वाव आहे, असेही ते म्हणाले.

डुडी म्हणाले, “जिल्ह्यातील शेतीमध्ये बदल घडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी निर्देश दिले होते. त्यानंतर सुमारे ५० बैठकांमधून पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्य पिकांची उत्पादकता वाढली पाहिजे, असा त्यात प्रयत्न केला आहे.” रस्तोगी यांनी राज्याच्या जीडीपीत वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविणे गरजेचे असल्याचे बोलून दाखविले. संजय काचोळे यांनी आभार मानले. यावेळी पवार यांच्या हस्ते शेतकरी तसेच कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू : कोकाटे

वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी पुण्यात उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत व्यासपीठ सामायिक केले. अजित पवार यांनी कृषिमंत्री म्हणून दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू, अशी ग्वाही दिली. मी खात्रीने सांगतो की, भविष्यात शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे कोकाटे यांनी एका अर्थाने आपल्या बाजूने सारवासारव केल्याचे दिसून आले. तसेच कृषी विभागाच्या यापूर्वीच्या सचिव व आयुक्तांनी काहीही काम केले नाही, त्यांचे कृषी विभागाकडे लक्ष नव्हते असेही ते म्हणाले. त्यामुळे आताच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसमोरील आव्हाने पेलावी लागतील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

Web Title: Farmers should not get discouraged, the government will not leave farmers in the lurch - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.