मंचर (पुणे) : शेतकऱ्यांनी संघटित होऊन भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून राज्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे, तरच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
पिंपळगाव खडकी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. धोरणे दिल्लीमध्ये ठरतात. त्यांचे दुष्परिणाम गाव-खेड्यांतील शेतकऱ्यांना भोगावे लागतात. कांद्यावर निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे. पामतेल आयात करून सोयाबीनचे भाव पाडण्याचे पापदेखील केले आहे. दुधाला बाजारभाव नाही. दुधाला पाच रुपये लिटरला अनुदान देण्याचे गाजर दाखवून अटी व शर्ती घालून शेतकऱ्यांना फसवण्याचे काम राज्य सरकार करत आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेक शेतकरी व जनावरांचा जीव गेला आहे. या भागातील शेतकऱ्यांनादेखील खूप काही भोगावे लागत आहे. शेतकऱ्यांनी संघटित होऊन भविष्यकाळामध्ये या प्रश्नावर आवाज उठवून राज्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे.
प्रभाकर बांगर यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही सर्वांनी जीव लावला पाहिजे. या भागालादेखील चळवळीतील काम करणारा एक सक्षम नेतृत्व मिळाले पाहिजे. आज आपण चारचाकी गाडी वर्गणी काढून त्यांना भेट दिली आहे. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, असेही शेट्टी म्हणाले. यावेळी प्रदेश युवक अध्यक्ष अमरसिंह कदम, माजी सरपंच संतोष गावडे, हभप बाजीराव महाराज बांगर, सरपंच दीपक पोखरकर, सचिन बांगर यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन संदीप वाबळे यांनी केले. जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांना यावेळी लोकवर्गणीतून चारचाकी वाहन भेट देण्यात आले. सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी प्रभाकर बांगर यांना अगदी शंभर रुपयांपासून २५ हजारांपर्यंत मदत केली व चारचाकी गाडी लोकवर्गणीतून घेऊन दिली आहे.