शिक्रापूर : शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची पीक पाहणी नोंद वेळेत केल्यास शासनाच्या विविध योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेता येतो. त्यासाठी केंदुर पाबळ जिल्हा परिषद गटातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाची ऑनलाईन पद्धतीने नोंद करण्याचे आव्हान जिल्हा परिषदेच्या सदस्य सविता बगाटे यांनी केले.
शासनाने राबवलेल्या ई पीक पाहणी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी स्वतःची पीक पाहणी स्वतःच्या मोबाईलवरून करणे याकरिता पाबळ, ता. शिरूर येथील पिंपळवाडी येथे जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ई पीक पहाणी याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी मोबाईलवरून पीक नोंदणी कशी करायची याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कार्यशाळेत शेतकऱ्यांना नोंदीबरोबर खरीप, रब्बी हंगाम व घेण्यात आलेल्या पिकांची माहिती देत त्याची नोंद कशी करायची याचे प्रात्यक्षिक पाबळच्या तलाठी डी. आर. बोरा यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, मंडलाधिकारी पी. सी. शेटे, पाबळच्या तलाठी डी. आर. बोरा, धामारीचे तलाठी एच. जी. घुगे, कोतवाल म्हातारबा चव्हाण, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत सातबाऱ्यामधील विविध अडचणीबाबत माहिती घेतली. यावेळी पाबळच्या तलाठी डी. आर. बोरा यांनी शेतकऱ्यांना पीक नोंदणीबरोबरच शेतीविषयक इतर माहिती उपलब्ध करून दिली.
---
फोटो १७ शिक्रापूर पाबळ ई पाहणी
पाबळ, ता.शिरूर येथे शासनाने राबवलेल्या ई पीक पाहणी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना माहिती देताना प्रशासकीय अधिकारी व जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे. (धनंजय गावडे).