राजगुरुनगर: खेड तालुक्यात १२ गावातून जाणाऱ्या रिंग रोडला विरोध करण्यासाठी आणि आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही. आंदोलन कर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे आज सकाळी ६ वाजता रिंग रोड व पुणे नाशिक रेल्वे विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी राजगुरूनगर येथील प्रांत कार्यालयासमोरील पाण्याच्या उंच टाकीवर जाऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला.
आठ दिवस आंदोलन केल्यावर कोणीच दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ पुणे रिंगरोड आणि पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या जमीन संपादन प्रक्रियेला विरोध दर्शविण्यासाठी रिंगरोड व रेल्वे विरोधी आंदोलनातील कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी प्रांत कार्यालया समोरील पाण्याच्या टाकीवर चढुन आंदोलन सुरू केले. त्यांच्या या जीवघेण्या आंदोलनाने महसुल विभाग, पोलीस प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली. पोलीस अटकाव करतील म्हणून पाटीलबुवा गवारी हे पहाटे अंधारात येऊन टाकीवर चढुन बसले. सकाळ झाल्यावर त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. दरम्यान,राजगुरूनगर शहरातील नागरिकांनी आंदोलन स्थळी मोठी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहाय्यक निरीक्षक राहुल लाड , संदिप भापकर पोलीस या ठिकाणी उपस्थित होते. अनेक विनंत्या करून देखील पाटिलबुवा गवारी खाली आले नाही.
तालुक्यातील खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, केळगाव, आळंदी, च-होली, धानोरे, सोळू, मरकळ आणि गोलेगाव या बारा गावांनी तीव्र विरोध केला असून खेड प्रांत कार्यालयासमोर गेली नऊ दिवसांपासून "ज्ञानेश्वरी वाचन चक्री उपोषण" सुरू आहे मात्र प्रशासनाने याबाबत दखल घेतली नाही.त्यामुळे समितीने आंदोलन तीव्र केले.