वडगाव काशिंबेग येथील शेतकरी वसंत तुकाराम डोके यांना तुटपुंजी शेती आहे. जिरायती व बागायती मिळून केवळ तीन एकर शेती व एक दुभती गाय या सर्व उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालते. आपल्या मुलाला चांगले शिकवून उच्चपदस्थ बनवण्याचा ध्यास डोके यांनी सुरुवातीपासून घेतला होता. तीन मुले, पत्नी यांच्यासह वडगाव येथे राहणाऱ्या डोके यांनी शेतात नगदी पिके घेऊन मुलाला पुढील शिक्षणासाठी पुणे येथे पाठवले. प्रमोद आता सीएची परीक्षा पास झाला. त्याच्या यशाने वसंत डोके यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. प्रमोद याने पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण वडगाव काशिंबेग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेतले. पाचवी ते दहावीपर्यंत तो मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात शिकला. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे पुढील शिक्षणासाठी तो पुणे येथील बीएमसीसी कॉलेजमध्ये गेला. महाविद्यालयात २०१६ पासून त्याने सीएच्या परीक्षेची तयारी सुरू केली. हा खडतर अभ्यासक्रम करत असताना त्याला वडिलांकडून वारंवार प्रोत्साहन भेटले. गावातील माजी सरपंच बाळासाहेब पिंगळे, मारुती डोके यांनी प्रमोद डोके याला प्रोत्साहित केले. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला प्रमोद डोके हा सीएची परीक्षा पास झाला. वडगाव काशिंबेग गावातील तो एकमेव सीए बनला आहे. सुरुवातीला अनुभवासाठी एखादी नोकरी पाहून नंतर सीएची प्रॅक्टिस सुरू करणार असल्याचे प्रमोद डोके यांनी सांगितले. प्रमोदच्या या यशाचे कौतुक ग्रामस्थांनी करत त्याचा सत्कार केला. आपला मुलगा सीए झाला हे सांगताना वसंत डोके यांना अभिमान वाटतो.
फोटो खाली: सीए परीक्षेत पास झालेल्या प्रमोद डोके याला आई-वडिलांनी पेढा भरविला.