भवानीनगर /लासुर्णे : काझड (ता. इंदापूर) येथील डाळिंब उत्पादक शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. १४) सकाळी घडली. सतीश हरिश्चंद्र शिंदे (वय ३८, रा. शिंदेवाडी, काझड) असे या शेतक-याचे नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे या शेतकºयाने आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. मात्र, वालचंदनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.शिंदे यांना सुमारे अडीच एकर शेतजमीन आहे. ती विकसित करणे, पाईपलाईन यासाठी शिंदे यांनी भवानीनगर येथील राष्ट्रीयीकृ त बँकेतून कर्ज घेतले होते. त्यांनी या कर्जातून डाळिंबबागदेखील विकसित केली. मात्र, तेल्या रोगामुळे डाळिंब बागेतून उत्पन्न मिळाले नाही. १६ जून रोजी त्यांना बँकेत कर्जफेडीसाठी कर्जाचा हफ्ता भरायचा होता. त्यासाठी शिंदे नातेवाइकांकडे पैसे मागत होते. मात्र, त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचे नातेवाईक शेखर नाळे यांनी सांगितले.या घटनेनंतर शेतकरी शिंदे यांचे लासुर्णे येथील शवविच्छेदन केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. या वेळी तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी या ठिकाणी भेट दिली. तसेच, तहसीलदार पाटील यांनी शिंदे यांच्या कुटुंबीयांचीदेखील भेट घेतली. शिंदेवाडी येथील शेतकºयाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडल्याची खबर बापू सुखदेव शिंदे यांनी दिली.
कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 2:53 AM