लोकमत न्यूज नेटवर्कमोरगाव : बारामती तालुक्यात गेल्या वर्षभरात ९ शेतकरी व त्यांच्या मुलांच्या आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्याग्रस्त भाग म्हणून केवळ विदर्भ व मराठवाडा ओळखला जात होता. मात्र, बारामती तालुक्यातील वाढत्या आत्महत्येच्या घटना पाहता, हा एक चितेंचा विषय बनत चालला आहे. यामुळे आत्महत्येचे प्रकार पाहता कर्ज, शेतीची गंभीर समस्या यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी समाजप्रबोधन शिबिर तालुक्यात राबविणे गरजेचे आहे.वषानुवर्षे पिढीजात चालत आलेल कर्ज सावकारी पाश, पावसाची दडी, दुबार पेरणी, अवकाळी पाऊस तर कधी हातातोंडाशी आलेली पिकं वादळवारे व पावसामुळे उद्ध्वस्त होणे यामुळे विदर्भ-मराठवाडा येथील शेतकऱ्यांमध्ये वाढत्या आत्महत्या हा एक चिंतेचा विषय बनत चालला होता. त्यातच आर्थिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, व्यावसायिक दृष्टीने प्रगती करणाऱ्या बारामती तालुक्यातील वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय दिवसेंदिवस बनत चालला आहे. तालुक्यात गेल्या वर्षभरात काही शेतकऱ्यांनी, काही शेतकऱ्यांच्या मुलांनी, तर काही ठिकाणी शेतकरी व्यावसायिकांनी आत्महत्या केलेल्या आहे. बारामतीसारख्या तालुक्यात १५ दिवस ते महिन्यातून दोनदा आत्महत्येच्या बातम्या समजू लागल्या आहेत. मोरगाव येथे गेल्या वर्षभरात तीन, तरडोली येथे एक, सुपा परिसरात चार, शिर्सुफळ एक आत्महत्या झाली आहे. नुकतेच तरडोली येथे आत्माराम शेळके या शेतकऱ्याने मुलीच्या लग्नासाठी पैसे व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. ही माहिती समजताच सामाजिक बांधिलकीच्या नात्याने बारामती येथील शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने आत्महत्याग्रस्त आत्माराम शेळके यांच्या मुलीचे लग्न लावण्यात आले. मात्र, समाजातील लोकांची मानसिकता बदलण्यासाठी खऱ्या अर्थाने समाजप्रबोधनाची आवश्यकता आहे. आत्महत्या झाल्यानंतर मदत मिळण्यापेक्षा आत्महत्या न होण्यासाठी उपाययोजनांसाठी समाजातील विविध संस्थांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंताजनक
By admin | Published: May 07, 2017 2:21 AM