पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रस्त्यावर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा टेम्पो जप्त करून त्याला तब्बल ४० हजार रूपयांचा दंड लावला आहे. तर गेल्या आठ दिवसांपासून महापालिका या टेम्पो चालकाला गाडी सोडविण्यासाठी हेलपाटे मारायला लावत आहे. त्याच्या निषेधार्थ माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सोमवारी महापालिकेच्या दारातच कांदा विक्री केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
शेतकरी आधीच होरपळला असताना महापालिकेची ही कारवाई त्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहत आहे. त्यामुळे, महापालिका प्रशासनाने तातडीने ही कारवाई करणाऱ्या तसेच गाडी सोडण्यासाठी शेतकऱ्याची अडवणूक करणाऱ्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली. यावेळी खोत यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी कांदे विकले. महापालिकेसमोर झालेले हे अचानक आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.