अनेक दिवसांपासून कर्जमाफी होणार असल्याचे जाहीर झाले आहे. मात्र, अद्याप रक्कम मिळाली नसल्याने व्याजाच्या रकमेचा डोंगर दिवसेंदिवस वाढला जात आहे.
महाआघाडीचे सरकार येताच सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी जाहीर केली. दोन लाख सरकार आणि राहिलेली रक्कम शेतकरी अशी योजना जाहीर केली. मात्र, कोरोनामुळे आर्थिक परिस्थितीत बिघाड झाला. त्यामुळे जाहीर केलेली २ लाख रुपयांची कर्जमाफी अडकून पडली आहे. कोणतीही बँक शेतकऱ्र्यांना नवीन कर्ज देत नाही. कर्जमाफी होऊन वर्षभर उलटल्याने वाढणाऱ्या व्याजाच्या कचाट्यात शेतकरी भरडला जात आहे. त्यातच मार्चअखेर जवळ आल्याने बँकांनी आपला फास आवळण्यास सुरुवात केली असून १०१ आणि जप्तीच्या कारवाया सुरू केल्या जाणार असल्याचे सूतोवाच केले जात आहे, तर अडचणीत असलेला शेतकरी नवीन कर्ज मिळत नसल्यामुळे सावकारांचे उंबरे चढत आहेत.
तक्रारवाडी कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विकास वाघ म्हणाले की, सरकारने दिलेल्या २ लाख रुपयांची हमी बँकांना देत वरील रकमेचा भरणा शेतकऱ्यांकडून करून घेतल्यास नवीन कर्जासाठी शेतकरी मागणी करण्यासाठी लायक होईल आणि सरकारकडे निधी उपलब्ध झाल्यास तो बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा.