रामदास डोंबे : खोर
पुण्याच्या बाजारपेठेतच नव्हे तर महाराष्ट्रभर आणि विशेषत: मुंबईमध्ये बोलबाला असलेल्या खोर वांगे या नावाने प्रसिध्द असलेल्या खोर (ता. दौंड) येथील वांग्याची ओळख जणू नामशेष झाली आहे. संकरित बी-बियाणांमुळे घडलेले उत्पादन आणि खोरमधील शेतकऱ्यांनी वांग्याच्या जागी अंजीरचे घेतलेले उत्पादन यामुळे खोरवांगी मागे पडले व आज मुंबईसह पुण्याच्या बाजारातही खोर वांगे दिसेनासे झाले.
साधारण १९८० ते १९८५ च्या दशकात ह्या खोर वांग्याच्या उत्पादनाने एकेकाळी मुंबईची बाजारपेठ चांगलीच हलवली होती. अतिशय लहान साईज, बिनकाटेरी देट, स्वादिष्ट, चवदार असलेले खोर वांगे मुंबई येथील भायखळा, दादर, वाशी, पुणे येथील बाजारपेठेत व्यापारीवर्ग या खोरच्या शेतकऱ्यांच्या मालगाडीची आतुरतेने वाट पाहत उभे असायचे.
याबाबत खोर वांगी उत्पादक शेतकरी नजीर शेख म्हणाले की, सन १९८० च्या दशकात १ एकरीमध्ये ४० बैलगाडी खत, मोलमजुरी यांचा खर्च मिळून २ हजार रुपये इतका खर्च होत होता. एकरी १२ पोती वांगी उत्पादन निघाले जायचे. ९ रुपये भावाप्रमाणे १०० किलो पोत्याचे १ हजार ८० रुपये एका वांगी तोड्याला व्हायचे. साधारण तीन महिने हा बाग चालत असून जवळपास एकरी एकूण खर्च ३ हजार रुपये होत असून या वांग्याचे उत्पादन तीन महिन्यांत २० हजार शेतकरी वर्गाला मिळायचे.
हे वांगे लहान असल्याने तोडण्यासाठी जास्त मजूर लागायचे व जसजसे संकरित बी-बियाणे बाजारपेठेत उपलब्ध होत गेले, तसतसे हे रुचकर स्वादिष्ट खोर वांगे पाठीमागे पडले गेले आणि एकेकाळी मुंबई राजधानी असलेल्या शहरातून खोरचे वांगे हद्दपार झाले. आज खोरच्या परिसरात खोरच्या वांग्याच्या जागेवर अंजीरबागेने जागा घेतली आहे. सन १९८० दशकात वांग्याच्या तुलनेत आज सन २०२१ च्या दशकात अंजिराचे उत्पादन जास्त निघत आहे. एकरी अंजीर बागेला साधारण ५० हजार रुपये खर्च होत असून, यामध्ये एकरी २ लाखांच्या आसपास चांगल्या प्रतीच्या दर्जेदार अंजीरापासून उत्पादन निघत आहे. परिणामी अंजिराची उत्पादन हे वांग्याच्या तुलनेत आजच्या परिस्थितीत उत्पादन जास्त होत गेल्यानेच आज खोरच्या प्रसिद्ध वांग्याकडे शेतकरी वर्गाने पाठ फिरवली आहे.
आकाराने लहान, बिनकाटेरी देठ स्वादिष्ट रुचकर चव असलेले खोर वांगे घेण्यासाठी बाजारपेठेत व्यापारी वर्गाची रांग पूर्वी लागायची. एक व्यक्ती साधारण ८ ते ९ वांगी त्या वेळी खायचे. घरगुती चुलीवर भाजून, वांग्याचे भरीत करून हे वांगे खाण्याची वेगळीच मजा त्याकाळी होती. या वांग्याचे देठसुद्धा खाण्यासाठी रुचकर होते. वाशीच्या बाजारपेठेत 'खोरचे वांगे' असे फलक त्या ठिकाणी लावण्यात देखील आला असल्याची माहिती माजी आमदार अशोक टेकवडे यांनी दिली आहे.
---
चौकट :
एकेकाळी खोर वांग्याने हलवली मुंबई बाजारपेठ
खोरच्या ' खोर वांग्याने' १९८० च्या दशकात चांगलीच किमया केली होती. मी स्वतः त्याकाळी खोर परिसरातून आठवड्यात दोन ते तीन वेळा ट्रक घेऊन यायचो आणि तब्बल दोन ट्रक इतका माल या भागातून घेऊन मुंबई येथील भायखळा, दादर, वाशी येथील बाजारपेठेत नेऊन विकला आहे. व्यापारी वर्ग पुणे जिल्हा म्हटलं की खोर नाव ऐकले की त्यांचे कान खोर वांग्याच्या दिशेने टवकारले जायचे. इतके अनन्यसाधारण महत्त्व या खोर वांग्यामुळे खोर गावाला प्रसिद्ध झाले होते. जसजसे संकरित बी-बियाणे बाजारपेठेत उपलब्ध होत गेले तस-तसे हे रुचजर स्वादिष्ट खोर वांगे नामशेष होत गेले.
- अशोक टेकवडे (माजी आमदार, पुरंदर)
--
फोटो २७खोर वांगी
फोटोओळ : खोर (ता. दौंड) येथील खोर वांगे