पुणे : बाजाराची गरज ओळखून शास्त्रोक्त पद्धतीने औषधी वनस्पतींचे उत्पादन घेतले, तर पुढील काळात हे शेतकरी ''रोल मॉडेल'' म्हणून समोर येतील. शेतकरी, वैज्ञानिक, उत्पादक आणि विक्रेता या सर्वांनी एकत्र येत काम केले तर आयुर्वेदातील आपले उत्पन्न दुपटीने वाढेल, असे मत आयुष मंत्रालयातील राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक व विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पश्चिम विभागीय औषधी सुविधा केंद्राच्या वतीने विभागीय स्तरावरील खरेदीदार व विक्रेत्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. पटवर्धन बोलत होते. या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, सामाजिक वनीकरण पुणे विभागाचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राचे विभागीय संचालक डॉ. दिगंबर मोकाट, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.अविनाश आडे, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एल.एन. सास्त्री, आयुर्वेदिक औषधी उत्पादन संघाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत भानुशाली, महाराष्ट्र फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ. कैलाश मोटे, डॉ. रामदास कुटे आदी उपस्थित होते.