'शेतकरी खूप अस्वस्थ, १० दिवसांत २५ आत्महत्या'; शरद पवारांचा अक्रोश मोर्चामधून निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 10:09 PM2023-12-30T22:09:16+5:302023-12-30T23:00:02+5:30
महाविकास आघाडीतर्फे आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता सभा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या सुख दुःखाचा आवाज हा दिल्लीपर्यंत पोहोचावा या हेतूने खासदार अमोल कोल्हे यांनी आक्रोश मोर्चा काढला. शेतकरी अस्वस्थ आहे. १० दिवसात यवतमाळ, अमरावती, वाशिम, वर्धा या ठिकाणी २५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले.
कांदा उत्पादक शेतकरी संकटात, दूध संघटना संकटात, सोयाबीन, कापूस शेतकरी संकटात हे सर्व पाहता जगावे कसे हा प्रश्न आहे आता आणि हे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला तर आजचे सरकार हे ढुंकून पाहायला तयार नाही, असा निशाणा शरद पवारांनी साधला. महाविकास आघाडीतर्फे आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता सभा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी शरद पवार बोलत होते.
अमोल कोल्हे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा हा प्रश्न मांडला. आज तुमचा हा आक्रोश मोर्चा पुण्यापुरता सीमित राहिलेला नाही, त्याचा आवाज, त्याची बातमी देशात गेलेली आहे, दिल्लीच्या संसदेत आहे, नागपुरात आहे, कलकत्त्याला आहे, ठिकठिकाणी बातमी गेली आणि त्यातून एक प्रकारची जागृती कष्टकरी आणि शेतकरी यांच्यात निर्माण व्हायला लागली. या सामुदायिक जागृतीच्या शक्तिवर आपण बदल करू शकतो आणि ते बदल करण्यासंबंधीचा संकल्प शिवछत्रपतींच्या जन्मभूमीपासून आपण केला त्यामुळे यात १००% यश येईल याची खात्री आहे, असं शरद पवारांनी सांगितले.
मी कृषी मंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा...
मी कृषी मंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा पहिलेच पत्र आलं की अमेरिकेवरून एवढे धान्य आपल्याला देशात आणायचे आहे त्यासाठी सही करावी लागेल, तेव्हा मी म्हणालो की, शेतीप्रधान देश आणि धान्य हे परदेशातून आणायचे. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं फाईलवर सही करा. नाईलाजाने तेव्हा सही करून परदेशातून धान्य आणले गेले. तेव्हाच मी निर्धार केला की, हे चित्र बदलायचे आणि बदललं देखील; शेतीमालाची किंमत कमी केली, खताच्या किमती कमी केल्या, त्याच्या डोक्यावरच ओझं कमी केलं, कर्ज माफ केलं आणि त्याचा परिणाम तीन वर्षाच्या आत या देशातल्या लोकांना लागेल तेवढे धान्य या काळ्या आईची इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी केलं आणि जगाच्या १८ देशांना धान्य निर्यात करण्याचे काम याच बळीराजांनी केले. एवढे कर्तुत्व, एवढी मेहनत, एवढी बांधीलकी ही शेतकऱ्याची आहे, असं शरद पवारांनी सांगितले.