भुलेश्वर: पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नव्याने विमानतळासाठी सुचवलेल्या गावात येथील स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. पुरंदर विमानतळ झाल्यास येथील शेतकरी उद्ध्वस्त होतील यासंदर्भात पुरंदर विमानतळ संघर्ष समितीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निवेदन देऊन विमानतळास विरोध दर्शवला आहे.
नायगाव, पांडेश्वर, राजुरी ,मावडी, पिंपरी, रिसे, पिसे येथील विमानतळासाठी सुचवलेल्या पर्यायी जागेचा असलेल्या विरोधाबाबत दिलेल्या निवेदनात संघर्ष समितीने म्हटले की पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप विमानतळबाधित गावांमधील लोकांना विश्वासामध्ये न घेता परस्पर विभागीय आयुक्त, महानगर आयुक्त, मुख्य कार्यकारी आयुक्त, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ,महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड व जिल्हाधिकारी पुणे, यांना पत्राद्वारे उल्लेख केलेल्या गावांची नावे पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास पर्यायी जागा म्हणून सुचवलेली आहेत. प्रसारमाध्यमातून व विविध वर्तमानपत्रांमधून सदर माहिती समोर आली आहे. या गावांमधील रहिवासी शेतकरी आहेत. तसेच पुरंदर उपसा सिंचन योजना व जानाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेचे लाभार्थी शेतकरी आहेत. या भागातील जवळपास ऐंशी टक्के क्षेत्र हे बागायती क्षेत्र आहे. या भागात डाळिंब, सीताफळ, पेरू, अंजीर, फळबागा असून ऊस लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे .त्याचबरोबर कांदा हे या भागाचे मुख्य पीक आहे. तसेच या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेततळी निर्माण केलेले आहेत. तसेच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन हे व्यवसाय जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो.
शासनाने विमानतळासाठी सदर शेतजमीन बळजबरीने घेतल्यास आम्ही शेतकरी उद्ध्वस्त होऊ. तसेच नवीन सुचवलेल्या पर्यायी जागेपासून जवळच मयुरेश्वर अभयारण्य असल्याने विमानतळासारखा प्रकल्प पर्यायी जागेत झाल्यास त्यांच्या नैसर्गिक अधिवासात धोका निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तसेच सदर जागेवर विमानतळ नको, अशी येथील स्थानिक शेतक-यांची ठाम भूमिका आहे. वरील सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, अशी मागणी पुरंदर विमानतळ संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश मुळीक, कार्याध्यक्ष उद्धव भगत ,उपाध्यक्ष पंढरीनाथ सोनवणे ,सचिव संतोष कोलते , विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे असंख्य सदस्य उपस्थित होते.
१४ भुलेश्वर निवेदन
पुरंदर विमानतळासंदर्भात शरद पवार यांना निवेदन देताना संघर्ष समितीचे पदाधिकारी.