पुणे, दि. 27 : विमानतळांवर सर्व विदेशी कंपन्यांच्या विविध बॅ्रंडची दालने असतात. तिथे देशातील उत्पादनांनाही स्थान मिळायला हवे. त्यादृष्टीने देशातील विमानतळांसह रेल्वे स्थानकांवरही विविध फळविक्रीची स्वतंत्र दालने सुरू करण्याचा विचार आहे. याबाबत संबंधित यंत्रणांशी चर्चा सुरू असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे दिली.महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, अखिल भारतीय द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष सोपान कांचन, राज्य संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, खजिनदार महेंद्र शाहीर आणि कैलास भोसले आदी व्यासपीठावर उपस्थित होते. गडकरी म्हणाले, रेल्वेस्थानके व विमानतळावर फळविक्री सुरू करण्याबाबत अपेडाने तत्वत: मान्यता दिली आहे. निर्यातक्षम माल ठेवल्यास या ठिकाणी फळांना मोठी बाजारपेठ मिळू शकते. राज्य सरकारनेही याबाबतीत पुढाकार घ्यायला हवा.राज्यात फळबागांची स्थिती चांगली असली तरी आता पुढील काळात नवनवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीवर होणारा खर्च कमी करणे आणि उत्पादनाचा दर्जा वाढविणे, हे सुत्र अवलंबण्याची गरज आहे. आता केवळ ज्वारी, गहू, तांदुळ पिकवून शेतकºयांचे भवितव्य बदलणार नाही. त्यासाठी शेतीला पुरक व्यवसायांचा विचार करण्याची गरज आहे. शेतकरीच पेट्रोल, डिझेलला पर्याय तयार करतील, असा विश्वास आहे. वाहतुक खर्च कमी करण्यासाठी देशातील १२ मोठ्या आणि २०० छोट्या बंदरांवरून अधिकाधिक कृषीमाल वाहतुक व निर्यातीसाठी प्रयत्न केले जात आहेत. द्राक्षाची मोठी बाजारपेठ असून बेदाणे निर्यातीसाठीही सांगली येथे जागेचा प्रस्ताव आहे, असेही गडकरी यांनी नमुद केले.पवार म्हणाले, सर्व पिकांमध्ये पारंपरिक पिके यावीत. हायब्रीडला काही अर्थ नाही, असे चमत्कारिक मत दिल्लीतील काही जण मांडतात. पण असे करून चालणार नाही. जगातून ज्याला मागणी आहे, पैसे जिथून मिळतात, त्या पिकांवर लक्ष देण्याची गरज आहे. नवीन वाणांना प्रोत्साहित करण्याची शासनाची भुमिका असावी. आंतरराष्ट्रीय बाजाराबरोबर स्थानिक बाजारात शेतमालाचे मार्केटिंगसाठी चौकटीबाहेरचा विचार करावा लागेल.द्राक्षाच्या नवीन जाती आणण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारही आर्थिक मदत करेल, असे फुंडकर यांनी सांगितले. कांचन यांनी महाराष्ट्रात बेदाणे पार्क उभारण्याची मागणी केली.----------------------... तर गुंतवणुक वाढवावी लागेलपुढील पाच वर्षात शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची पंतप्रधानांची कल्पना आहे. त्यासाठी या क्षेत्रातील गुंतवणुक व शेतीची उत्पादकता वाढवावी लागणार आहे. शेतीमध्ये परवडणारे यांत्रिकीकरण आणणे गरजेचे आहे. त्याशिवाय उत्पादनात वाढ होणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
शेतकरीच पेट्रोल, डिझेलला पर्याय तयार करतील - नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 8:08 PM