लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शासनाच्या सूचनेनुसार महसूल विभागाच्यावतीने आता शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा घरपोच देण्यात येणार आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात या मोहिमेची सुरुवात होणार आहे.
महसूल व वनविभाग तसेच जमाबंदी आयुक्त व संचालक भूमिअभिलेख यांचे निर्देशानुसार व जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंतीपासून सुधारित नमुन्यातील डिजिटल स्वाक्षरीत गाव नमुना सातबाराचे मोफत घरपोच वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
भोर तालुक्यात एकूण २०० महसुली गावे असून ८ महसुली मंडळांचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत फक्त शेतीचे डिजिटल स्वाक्षरीत गाव नमुना नं. सातबारा वितरित करण्यात येणार आहे. सदर मोहीम कालावधीत गाव नमुना नं. सातबारा केवळ एकदा मोफत देण्यात येणार आहे.
भोर तालुक्यातील ४२ हजार २०६ व्यक्तिगत खातेदार, ९ हजार ७५६ संयुक्त खातेदार, २२ हजार ३८६ सामाईक खातेदार, ३ हजार २१० अभिव्यक्त कुटंब या लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. गाव नमुना नं. सातबारा प्राप्त झाल्यानंतर संबंधित गाव नमुना सातबारा उताऱ्यात त्रुटी असेल तर तत्काळ त्याबाबतचा अभिप्राय नोंदवायचा आहे. त्याबरोबर गाव नमुना सातबारावर पिकांच्या अचूक नोंदीसाठी शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी या ॲपचा वापर करावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आव्हान उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे आणि तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.