खेड (डेहणे) : खेडच्या पश्चिम भागातील अदिवासी भात उत्पादक शेतकरी आता स्वत:ची ‘धान्य प्रक्रिया’ करणारी कंपनी स्थापन करणार आहेत. या कंपनीची स्थापना व त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी दरकवाडी (ता. खेड) येथे आदिवासी शेतकºयांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही नावीन्यपूर्ण संकल्पना सहायक जिल्हा अधिकारी व आदिवासी प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद यांची असून त्यांनी या बैठकीत आदिवासी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आदिवासी शेतकरी, आदिवासी विभाग, घोडेगाव, कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या कंपनीत जुन्या भात वाणाचे संवर्धन, सेंद्रीय पद्धतीने भात उत्पादन, हाताळणी, प्रतवारी व कंपनीच्या ब्रँडवर विक्री होणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. आयुष प्रसाद यांनी अदिवासी शेतकरी गट स्थापन करून, संचालक मंडळ स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन केले. या कंपनीत दलालांना जागा नसल्याने शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी शेतकऱ्यांच्या अडीअडचणींच्या बाबतीतही चर्चा करण्यात आली. सेंद्रीय पद्धतीने जुन्या व पारंपारिक भात वाणाच्या उत्पादनासाठी व येणाऱ्यां अडचणींवर मात करण्यासाठी खेड कृषी विभाग तांत्रिक मदत करेल, अशी ग्वाही तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर यांनी दिली. यावेळी सह्याद्री स्कूलच्या दीपा मोरे यांनी मार्गदर्शन केले. मंडल कृषी अधिकारी आर. बी. बारवे, कृषी पर्यवेक्षक आर. ए. जाधव, कृषी सहायक एस. पी. इंदोरे, एस. बी. रोडे, पी. एन. पवार, डी. जी. डोलारे, एस. के. सुपे, नाईकरे, आदिवासी शेतकरी तुकाराम भोकटे, हरिभाऊ तळपे, मंदा काठे, सुभाष डोळस, किरण वाळुंज, रामदास लांडगे व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.