महूडे (पुणे): गेले काही दिवसांपासून पाऊसाने ओड दिली होती. परंतु गुलाब या वादळामुळे भोर तालुक्यात ढगाळ वातावरण आहे तसेच पाऊसाच्या तुरळक सरी पडल्याने बळीराजाची चांगलीच धांदल उडाली आहे. या पावसामुळे सोयाबीन व भुईमूग या पिकाचे काय होणार? यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
भोर तालुक्यात शेतकऱ्याचे मुख्य पीक भात हे आहे. याचे लागवडीचे क्षेत्र ७ हजार ५०० हेक्टर तर भुईमुग ४ हजार १०० हेक्टर व सोयाबीन ३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या पडणारा पाऊस हा भात पिकास पोषक असला तरी काढणीस आलेल्या भुईमूग व सोयाबीन पिकास घातक आहे. काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने भुईमूग व सोयाबीन ही पिके काढणीस आली आहेत. त्यामुळे ही पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ चालू आहे. परंतु मंगळवार (दि.२८) रोजी दुपारी पाऊस झाल्याने भुईमुग, सोयाबीनची काढणी बंद करावी लागली.
बालशौर्य: तेरा वर्षांच्या आयुषने दिले दोघांना ‘आयुष्य’
सध्या शेतीच्या कामासाठी मजुरास २०० रुपये रोज दिला जात आहे. तर अनेक शेतकरी ( वारंगुळा ) एकत्र पद्धतीने पिकांची काढणी करत आहेत. सोयाबीन काढल्यानंतर पावसाच्या भीतीमुळे शेतातच मशीन (यांत्रिक ) भरडले जात आहे. त्यासाठी एका भरलेल्या सोयाबीन पोत्याचे ४०० रुपये घेतले जात आहे. सोयाबीड काढणीनंतर भरडण्यासाठी मशीन वेळेत मिळत नाही त्यामुळे काहींनी शेतातच काढलेले सोयाबीन व्यवस्थित रचून ठेवले आहे. पावसात भिजू नये म्हणून त्यावर प्लास्टिक कागद ठेवला आहे.शेतातून काढून आणलेल्या भुईमूग शेंगा पावसात वाळवायच्या कशा? हाही प्रश्न बळीराजा समोर उभा आहे.
सोयाबीन यांत्रिक पद्धतीने भरडण्यास एका पोत्यात चारशे रुपये दिले जातात. कारण डिझेल किंमतीत वाढ झाल्यामुळे सोयाबीन मशीनद्वारे भरडण्यासाठी किंमतीत वाढ नाईलाजास्तव करावी लागत असल्याचे सोयाबीन मशीनद्वारे भरडणारे विजय बांदल, रुपेश बांदल, सर्जेराव बांदल ( ब्राम्हणघार ) हरिदास खाटपे, ( शिंद )यांनी सांगितले.