पुणे : राज्यात विशेषत: कोकण व विदर्भात चांगला पाऊस होत असला तरी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात चांगल्या व सर्वदूर पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी चिंतेत पडला आहे. येत्या चार दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते चांगल्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर कोकणात काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडेल.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पालघर, ठाणे, मुंबईत येत्या तीन दिवसात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजपर्यंत झालेला पाऊस (मिमीमध्ये) : डहाणू ३० मिमी, कोल्हापूर ८, महाबळेश्वर २५, पुणे २, सातारा ३, यवतमाळ ५ , ब्रह्मपुरी २, अमरावती १.
शहरात काही भागात पाऊस
पुण्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी काही काळ उन्हाचा चटका वाढल्यानंतर दुपारनंतर हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. काही भागात त्याचा जोर जास्त होता. अक्षय मेझरमेंट या खासगी संस्थेने केलेल्या नोंदीनुसार कात्रज परिसरात ८.४ तर खडकवासला परिसरात ५.८ मिमी पाऊस झाला.