लोणी काळभोर: शेतकऱ्यांनी ज्ञानाची जोड कृतीला देऊन तंत्रज्ञान आत्मसात केले तरच शेती फायदेशीर होऊ शकते, असे मत कृषी विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी व्यक्त केले.
शिंदवणे (ता. हवेली) येथील संत यादवबाबा मंदिरात महाराष्ट्र शासनाच्या कृषी संजीवनी मोहीम-२०२१ चे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना विकास पाटील बोलत होते. या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे, हवेली तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर, हडपसर मंडल कृषी आधिकारी गुलाब कडलग, पुरुषोतम काकडे, मेघराज वाळुंजकर, माजी सरपंच गणेश महाडिक उपस्थित होते.
विकास पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून सरी वरंबा पद्धतीने बियाण्याची पेरणी केली, तर ८ ते १० किलो बियाण्यांची बचत होते. ज्ञान, कृती, तंत्रज्ञान यांच्या साह्याने बियाणे, खते यांची बचत होते. जीवाणू प्रक्रिया केल्यास पिकांवर कीड, रोग पडण्याची शक्यता कमी होते. सध्या पेरणीचे दिवस आहेत. या दिवसात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. कृषी विभागाच्या सर्व आधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून शेेेतकऱ्यांनी आपले उत्पादन व उत्पन्न वाढवावेे.
ज्ञानेश्वर बोटे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाची कृषी संजीवनी - २०२१ मोहीम २१ जून ते १ जुलै या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना देण्याचा उद्देश यामागे आहे. या वेळी माजी सरपंच गणेश महाडिक यांनी ही मनोगत व्यक्त केले. या वेळी उत्कृष्ट कर्मचारी कृषी सेवक शंकर चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी शेतीनिष्ठ शेतकरी अरुण घुले यांच्या शेतातील फळबाग योजना, गांडूळखत प्रकल्प, ठिबक सिंचन, पाला पाचोळ्या पासून सेंद्रिय खत या उपक्रमांची पाहणी करण्यात आली.