लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामीण भागात रुग्णसंख्या आटोक्यात येत नसून हॉटस्पॉट गावांच्या संख्येतही वाढ होत आहे. रुग्णवाढीचा दरही कायम असल्याने नाईलाजाने ग्रामीण भागाला निर्बंधातून सूट देण्यात आलेली नाही. असे असतानाही या निर्बंधांना हरताळ पासला जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. तर या निर्बंधाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी केवळ आरोग्य यंत्रणा आणि ग्रामपंचायतीवर आली असून तलाठी, पोलीस यंत्रणा गावाकडे फिरकत नसल्याने याचा ताण जिल्हा परिषदेच्या यंत्रणेवर येत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा बाधित दर पाच टक्क्यांखाली आहे. त्यामुळे दुपारी चार वाजल्यानंतर असलेले निर्बंध उठविण्यात आले. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर असली, तरी ती कमी गेल्या काही दिवसांपासू आटोक्यात आलेली नाही. तीन आठवड्यांपासून बाधित दर हा साडेपाच टक्के आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत गावा-गावांत, वाडी-वस्त्यांवर कोरोनाचे रुग्ण आढळत होते. सध्या १३ तालुक्यांतील सुमारे ४०० गावांत किमान १ किंवा २ पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, १०९ हॉटस्पॉट गावांत १० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. जिल्हा परिषदेने दहापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांत बाधित कुटुंबांतील सर्व सदस्यांची आणि ज्या गावात दहापेक्षा कमी रुग्ण आहेत त्याठिकाणी कोरोना चाचण्या करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या तीन आठवड्यांत या मोहिमेंतर्गत २ लाख २२ हजार १ हजार १४६ नागरिकांच्या चाचण्या केल्या आहेत.
ग्रामीण भागात सर्व दुकाने ४ वाजता बंद होणे अपेक्षित आहेत. मात्र, ती होत नाहीत. महामार्गावरील सर्व दुकाने, हॉटेल हे रात्रभर सुरू असतात. या ठिकाणी गावातील तसेच बाहेर गावातील नागरिक येत असल्याने रुग्णसंख्या ही कमी होण्याऐवजी वाढती आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ही पोलीस यंत्रणेची आहे. मात्र, ही कारवाई होताना दिसत नाही. कोरोना नियंत्रित आणण्यासाठी तलाठ्यांची महत्वाची जबाबदारी आहे. मात्र, गाव पातळीवर नियमांची अंमलबजावणी करण्यास ही यंत्रणाही कमी पडत आहे. यामुळे जर कोरोनाला खऱ्या अर्थाने नियंत्रणात आणायाचे असल्यास आरोग्य यंत्रणेसोबतच इतर यंत्रणांनीही तेवढाच पुढाकार घेणे गरजेचे आहे.
चौकट
ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालमकंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला बैठक घेऊन सूचना देत असतात. त्यावेळी प्रशासनाकडून आम्ही खूप काम करत असल्याचे दाखवले जाते. मात्र, प्रत्यक्षात ग्रामीण भागात परिस्थिती वेगळी आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर यांच्यावर कोरोना चाचण्या आणि लसीकरण असा दुहेरी ताण आहे. तर निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेले अनेक अधिकारी व कर्मचारी गावात राहत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.