लोकमत न्यूज नेटवर्क
नसरापूर / खेड-शिवापूर : राज्यातील वाहनचालक आणि वाहतूक चालकांना काल मध्य रात्रीपासून (दि.१५) रात्री १२ वाजल्यापासून शिवापूर टोलनाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केल्याने खेडशिवापुर टोलनाक्यावर फास्टँगची वसुली मंगळवारपासून धडाक्यात सुरू होती. ज्या वाहन चालकांनी फास्टँग भरलेला नव्हता त्यांच्याकडून दुप्पट रकमेने टोलवसूली होत होती. यामुळे वाहनचालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत होते. परिणामी वाहतूक व्यवस्था कोलमडत होती.
खेड-शिवापूर येथील टोल नाक्यावर स्थानिक व रोखीने फास्ट भरणाऱ्यांना दोन लेन राखिव ठेवल्या होत्या तर उर्वरित फास्टँग भरणारांसाठी लेन उपलब्ध केल्या होत्या. मात्र, रोखीने टोलभरणाऱ्यांच्या लेनवर वाहनांच्या लांबच लाब रांगा होत्या. देशभरात फास्टँग अनिवार्य केला गेला असला तरी अनेक वाहनचालकांना याबाबत पुर्ण कल्पना नसल्याने गोंधळाचे चित्र होते.
टोल नाक्यावर फास्टँग नसणाऱ्या कडून डबल दंड वसुली करण्यात येत होती. त्यामुळे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये भांडणे होत होती. प्रवासी टोल नाका कर्मचाऱ्यांना सांगत होते की, आम्ही फास्ट टॅग भरला आहे. तर टोल कर्मचारी त्या वाहनधारकांना तांत्रिक अडचणीचे कारण देऊन फास्टँगची ऑनलाईन नोंदणी झाली नाही असे सांगत होते. त्यामुळे भांडणे सुरू होती. यामुळे वाहने अडकून पडली होती. त्यामुळे टोल नाका परिसरास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
कृती समितीचा आंदोलनाचा पावित्रा
टोलनाक्यावर टोलनाका हटाव कृती समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. सोमवारीमध्यरात्री पासून सुरू झालेल्या फास्टँगची पाहणी करण्यासाठी आलेले स्थानिक नागरिक आणि समितीने फास्टँग वसुली बाबत आक्रमक पवित्रा घेतला. अखेर दुपारनंतर ठरल्यानुसार एम एच १२ व १४ वाहनांना यापूर्वी दिलेली मोफत सवलत पुन्हा सुरू करण्यात आली. टोल नाक्यावर स्थानिकासाठी फास्टँग आणि दिलेली सूट कायम आहे का? यासाठी समितीचे ज्ञानेश्वर दारवटकर, दिलीप बाठे, डॉ. संजय जगताप, शहाजी अडसूळ आदींनी टोलनाक्यावर घटनास्थळी जाऊन जाचक टोलवसुली बाबत आक्षेप घेतला. यानंतर दुपारनंतर स्थानिक वाहनांना मोफत सोडण्यात आले.
चौकट
खेडशिवापूर टोलनाका हा मुळातच पीएमआरडी हद्दीच्या बाहेर तातडीने हटवावा अशी स्थानिकांची कायमची मागणी आहे. वर्षापुर्वीच्या आंदोलनात ठरलेल्या निर्णयानुसार टोलनाका बाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत एमएच १२ व १४ क्रमांकाच्या वाहनांना दिलेली सुट कायम ठेवावी. एमएच १२ व १४ क्रमांकाच्या वाहनांना विना फास्टँगच्या किमान चार लेन उपलब्ध कराव्यात. फास्टँगची स्थानिक वाहनधारकांवर जबरदस्ती केली तर जनता गप्प बसणार नाही, त्याची जबाबदारी सर्व टोल प्रशासनावर राहील.
- ज्ञानेश्वर दारवटकर, निमंत्रक, खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती