खळद : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी खानवडी येथे महात्मा फुले यांच्या जन्मगावी मंगळवारी खानवडी ग्रामस्थ व विमानतळ विरोधी कृती समिती यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.पुरंदर तालुक्यात होणाºया विमानतळासाठी पारगाव मेमाणे, खानवडी, एखतपूर-मुंजवडी, कुंभारवळण, वनपुरी या भागात सर्वेक्षण झाले आहे. यात येथील ग्रामस्थांच्या जमिनी जाणार असल्याने नागरिक हवालदिल झाले आले आहेत. या विमानतळाविरोधात ग्रामस्थ आणि विमानतळ विरोधी कृती आक्रमक लढा उभारणार असून, याची सुरुवात मंगळवारी खानवडी येथे महात्मा फुले यांच्या १२७ व्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून करण्यात आली. या वेळी बोलताना विमानतळ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष जि.प.सदस्य दत्ता झुरंगे म्हणाले की, विमानतळ होऊन आमचे शेतकरी देशोधडीला लागणार असेल, तसेच ज्यांनी समाजातील तळागाळातील घटकापर्यंत शिक्षणाचे द्वारे खुली केली, त्या थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या स्मृती धोक्यात येणार असतील, तर आम्हाला हे विमानतळ नको. शासनाने ते अन्यत्र कोठेही न्यावे. असे न झाल्यास विमानतळाविरोधात आम्ही मोठा लढा उभारू. देश पारतंत्र्यात असताना इंग्रज दरबारी शेतकºयांची कैफियत महात्मा फुले यांनी मांडली. त्यांच्याच गावात आज देशाला स्वातंत्र्य मिळाले असतानाही आपलेच सरकार येथील शेतकºयांना विश्वासात न घेता, त्यांच्या मानगुटीवर विमानतळाचे भूत लादत आहे. या सरकारचा निषेध ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला. या वेळी पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, रमेश बोरावके, सर्जेराव मेमाणे, लक्ष्मी धिवार, सुनील धिवार, रवींद्र फुले, चंद्रकांत फुले, रामदास होले आदीउपस्थित होते.अन्न गोड लागेना...पतीच्या निधनानंतरही अगदी खंबीरपणे संसाराचा गाडा हाकत मोठ्या कष्टाने मुलांना लहानाचे मोठे करीत, काळ्या आईची सेवा करीत माळरानावर नंदनवन फुलवले ती जमीन जाणार असल्याचे समजल्या पासून अन्न-पाणी गोड लागत नसून जिवात जीव असेपर्यंत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत या विमानतळाला विरोध करणार असल्याचे येथील अंजनाबाई होले या वृद्ध महिलेन तळमळीने सांगितले.
विमानतळाविरोधात उपोषण, खानवडी ग्रामस्थ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 2:38 AM