पुणे : आषाढीनंतर श्रावण, भाद्रपद, गणेशाेत्सव, नवरात्र उत्सव ते दिवाळीपर्यंत धार्मिक सण-उत्सव सुरू होतात. रविवारी आषाढी एकादशी असल्याने लाखो वारकरी मोठ्या प्रमाणात उपवास करीत असतात, मात्र सध्या वाढत्या महागाईत उपवासाला लागणाऱ्या भगर, शेंगदाणे, साबुदाणा या साहित्यातही पाच ते दहा टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी उपवास करणेही आवाक्याबाहेरचे झाले आहे.
महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिक धार्मिक उपवास करतात. काही लोक आवडीनेही उपवासाचे पदार्थ खातात. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी कायम असते. मागील वर्षाच्या तुलनेत उपवासाचे दर वाढल्याने सामान्य नागरिकांना उपवास करणेही परवडेनासे झाले आहे. त्यामुळे सामान्य नागरिक उपवासाच्या दिवशी पूर्ण उपवासच धरून आषाढी एकादशी साजरी करण्यावर भर देत आहेत.
किलोचे दर
भगर : १०५ ते ११५साबुदाणा : ५० ते ५४शेंगदाणे : ११० ते १२०
वस्तूंचे भाव दिवाळीपर्यंत तेवढेच राहणार
भगर आणि शेंगदाणा हे उपवासाला लागणारे नियमित वस्तू आहेत. सध्या शेंगदाण्याचे दर आठ ते दहा टक्केने वाढले आहेत. दिवाळीपर्यंत धार्मिक सण उत्सव असतात. त्यामुळे हे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या वस्तूंचे भाव दिवाळीपर्यंत तेवढेच राहणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही असे मार्केटयार्डमधील व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले.
उपवास करणे सध्या सामान्य नागरिकांना महाग पडत आहे
आषाढी एकादशीला दरवर्षी उपवास धरत असतो. यावर्षी केळी, रताळ खाऊन एकादशी उपवास करणार आहे. महागाई वाढली तरी आनंदाने आषाढी एकादशी साजरी करतो. या पूर्वीच्या तुलनेत उपवासाच्या साहित्याचे दर सात ते आठ रुपये वाढल्याने उपवास करणे सध्या सामान्य नागरिकांना महाग पडत आहे. तरीही देवाविषयी श्रध्दा असल्याने उपवास करणार असल्याचे जनता वसाहत येथे राहणारे सुजित रणदिवे म्हणाले आहेत.