पुणे : स्वयंसेवी संस्थांना कोविड केअर सेंटर मध्ये काम करण्यासाठी स्वयंसेवकांचा तुटवडा जाणवत आहे. मात्र या संकट काळात २० ते २५ वर्षे वयोगटातील तरुण पिढी या सेवाकार्यासाठी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहे. तरुण पिढी फक्त मोबाईलमध्येच दंग असते त्यांना आसपास काय घडतंय यांच्याशी काही देणेघेणे नसते या समजुतीला युवा पिढीने आपल्या निस्वार्थी सेवेतून छेद दिला आहे.
गरवारे महाविद्यालय येथे समर्थ भारत पुनर्बांधणी योजनेअंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, महापालिका , सह्याद्री हॉस्पीटल आणि गरवारे महाविद्यालय यांच्या वतीने कोविड केअर सेंटर कार्यरत आहे. यामध्ये स्वयंसेवक म्हणून युवा पिढी काम करत आहे. वैष्णवी राठी या युवतीने नोकरीपेक्षा सेवा कार्याला महत्व देऊन एक वेगळा आदर्श युवापिढीसमोर निर्माण केला आहे. या अनुभवाविषयी तिने 'लोकमत' ला सांगितले की फेब्रुवारी मार्च पासून कोरोनाचे संकट आल्यावर डोक्यात एकच विचार होता की लोकांना मी कशा प्रकारे मदत करू शकते. गरवारे कॉलेजला कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे असे कळले. दरम्यान, मी नोकरीसाठी अर्ज केला होता आणि त्यामध्ये माझी निवड झाली. ऑफिसला माझ्या सामाजिक कामाची कल्पना दिली आणि १५ दिवसांनी जॉईन होईन असे कळविले. पण त्यांच्याकडून कोणतेच उत्तर आले नाही. मग बाबांसमोर माझी नोकरी जाण्याची भीती व्यक्त केली. तेव्हा बाबा म्हटले की नोकरी गेली तरी ती परत मिळेल. पण ही संधी परत मिळणार नाही.त्यानंतर कोविड केअर सेंटरला काम करण्यासाठी सज्ज झाले. ज्या लोकांच्याजवळ जायला इतर लोक घाबरतात त्यांच्यासाठी आम्ही काम करत आहोत याचे खूप समाधान वाटत असल्याची भावना तिने व्यक्त केली. .....
असे असते कामाचे स्वरूप
स्वयंसेवकाना कामाच्या शिफ्ट दिल्या जातात. स्वयंसेवकांना सर्जिकल कॅप, मास्क दिला जातो. स्वयंसेवकांनी सकाळी काढयाचे ग्लास कोविड रुग्णाच्या इमारतीत जाऊन ते रुग्णांच्या खोलीबाहेर ठेवायचे. रुग्णाला कुणी पार्सल दिले तर ते पाहोचवायचे, नवीन प्रवेश घ्यायचा किंवा डिस्चार्ज देण्याची यादी तयार करायची. पीपीई किट घालून रुग्णाचे प्लस, एसपीओटू आणि टेम्प्रेचर चेक करायचे. रुग्णांना जेवण देण्याबरोबरच रुग्णांना बाहेरून गोळ्या आणून देणे, खासगी रुग्णालयात चाचणी करून आणणे ही कामे स्वयंसेवक करतात. आमची पूर्णपणे काळजी घेतली जाते. आम्हाला काढा आणि आयुर्वेदिक औषधे दिली जात असल्याचे वैष्णवीने सांगितले.
.......
आमच्याकडे सध्या २२५ स्वयंसेवकांची नोंदणी झालेली आहे. यात ९९ टक्के प्रमाण हे तरुणाईचेच आहे. आठवड्याला ३५ स्वयंसेवकांची गरज भासते. दर आठवड्याला २५ स्वयंसेवक येतात. गरवारे, डेक्क्कनच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे वस्तीगृह येथे कोव्हिडं केअर सेंटर सुरू आहे. लवकरच कंमिन्स येथे सेंटर सुरू केले जाणार आहे. सणावारामुळे स्वयंसेवकांची कमतरता जाणवत आहे.तरी या कार्यासाठी स्वयंसेवक म्हणून नागरिकांनी पुढे यावे.
- महेश पोहनेरकर, समन्वयक कोविड केअर सेंटर.