मंचर (पुणे) : समोर चाललेल्या दुचाकीला कारने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखनगावच्या हद्दीत बेल्हे जेजुरी महामार्गावर सकाळी घडली. रसिक रंगनाथ दौंड (वय १९, रा. लाखनगाव) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
यासंदर्भात पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रसिक रंगनाथ दौंड (वय १९, रा. लाखनगाव, दौंडवस्ती, ता. आंबेगाव) हा सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्याच्या जवळ असलेली दुचाकी (क्र.एमएच १४ सीक्यू ९८३१)वरून घरून निघाला होता. लाखनगाव गावच्या हद्दीत बेल्हे जेजुरी महामार्गावरून कार (क्र.एमएच १४ केएस ८०८७) मागून वेगाने आली. अल्टो गाडीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक देऊन अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील तरुण रसिक याला हाता-पायास व डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर कार रस्त्यालगत पलटी झाली. दुचाकीचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात दत्तात्रय दौंड यांनी फिर्याद दिल्यानंतर चालक सागर भीमाजी साळवे (रा. साकुर मांडवे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याच्या विरोधात पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रसिक दौंड यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रसिक याचे नुकतीच दहावीचे शिक्षण पूर्ण झाले होते. आईवडिलांचा तो एकुलता एक होता.