लोणावळा (पुणे) : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर वाघजाई मंदिराच्या खालील बाजूला असलेल्या खंडाळा बॅटरी हिल येथील वळणावर भीषण अपघात झाला. सोमवारी रात्री साडेदहा वाजता मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर हा पलटी होऊन पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारवर पडल्याने हा अपघात झाला. यामध्ये कार पूर्णपणे दबली गेली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.
याप्रकरणी किशोर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात कंटेनर चालकावर लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये भादवी कलम 304 (अ) 279, 337, 338 मोटार वाहन अधिनियम 184,134 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या भीषण अपघातात दत्तात्रय रामदास चौधरी (वय 55) व कवीता दत्तात्रय चौधरी (वय 46 वर्षे दोघेही रा. निमडाळे, जि. धुळे सध्या रा. देवकणपिंपरी, जि. जळगाव) यांचा मृत्यू झाला. भुमीका दत्तात्रय चौधरी (वय 16 वर्षे), मितांश दत्तात्रय चौधरी (वय 9 वर्ष, दोघेही रा. निमडाळे, जि. धुळे सध्या रा. देवकणपिंपरी, जि. जळगाव), योगेश श्रीराम चौधरी (वय 40 वर्षे), जान्हवी योगेश चौधरी (वय 31 वर्षे), दिपांशा योगेश चौधरी (वय 9 वर्ष), जिगीशा योगेश चौधरी (वय 1.5 वर्षे चौघेही राहणार संस्कृती बिल्डींग राव कॉलनी तळेगाव, ता. मावळ) हे जखमी झाले आहेत.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (20 मे) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनर (MH 14 FT 1445) वरील चालकाचा खंडाळा बॅटरी हिल येथील उतार व वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने सदरचा कंटेनर पुण्याच्या दिशेने येणारी कार (MH 14 BX 1605) वर पलटी झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कार कंटेनरच्या खाली पूर्णपणे दबली गेली. या अपघातात कारच्या चालकासह एका महिलेचा मृत्यू झाला तर गाडीमधील अन्य सहा जण जखमी झाले आहे. अपघातानंतर कंटेनर चालक हा घटनास्थळावरून पळून गेला आहे. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या भीषण अपघाताच्या घटनेचा तपास लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड हे करत आहेत.