धनकवडी : जांभुळवाडी दरी पुलावर चार वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी (दि.11) पहाटे 3.45 वाजता घडली. मोठ्या कंटेनरनची लक्झरी बस, टेम्पो व कारला धडक दिल्या मुळे झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
विशाल कुमार नाविक (वय 22 वर्षे), शाहनवाज झुल्फिकार मुंन्सी (वय 30 वर्षे) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर सुभाष इंदलकर, पुजा बागल, जियालाल निसार अशी जखमींची नावे आहेत.
पुण्यात अपघातची मालिका सुरूच आहे. नवले ब्रिजच्या आधी व नव्या कात्रज बोगद्याच्या पुढं असलेल्या जांभूळवाडी दरी पुलावर बेंगळुरूहून एक भरधाव कंटेनर येत होता. या ठिकाणी तीव्र उतार असल्याने कंटेनर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून त्याने लक्झरी बस, टेम्पो व कारला जोरदार धडक दिली. यात काही वाहनांचे नुकसान झाले तर अपघातानंतर कंटेनर पूलाखाली अर्ध्या वर लटकला होता. तर एक बस रस्त्यावर उलटल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेची माहिती पहाटे ४ च्या सुमारास अग्निशमन दल आणि पोलिसांना मिळाली. अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदत व बचावकार्य सुरू केले आहे. कंटेनरमधील दोघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना तातडीने दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अपघातानंतर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी येत अपघातग्रस्त वाहने बाजूला केले आहे. यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरुळीत करण्यात आली आहे.