पिंपरी : ब्रेक फेल झालेल्या शिवशाही बसने पाच चारचाकी तसेच दोन दुचाकी अशा सात वाहनांना धडक दिली. यात चार जण जखमी झाले. रस्त्याच्या बाजूला संरक्षक कठड्याला धडकून शिवशाही बस थांबली. बसमधील कोणालाही दुखापत झाली नसली तरी या अपघातामुळे बसमधील सर्व प्रवाशांचा तसेच महामार्गावरील इतर वाहनचालक व प्रवाशांचाही थरकाप उडाला. मुंबई - बेंगळूर महामार्गावर पाषाण तलावाजवळ रविवारी (दि. १६) दुपारी पावणेदोनच्या सुमारास हा अपघात झाला.
अमित झा (वय ३५, रा. हिंजवडी), कमलेश रामेश्वर महापुरे (वय २८, रा. आळंदी), तानाजी नारायण देशमुख (वय ६२, रा. कल्याण) त्यांची पत्नी कल्पना तानाजी देशमुख (वय ५४) अशी जखमींची नावे आहेत. विलास मानसिंग जाधव (वय ५५, रा. उडतरे, ता. वाई, जि. सातारा) असे शिवशाही बसच्या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास जाधव हा रविवारी बोरिवली ते सातारा ही शिवशाही बस घेऊन मुबई-बेंगळूर महामार्गावरून जात होता. त्यावेळी पुणे येथील पाषाण येथे तलावाजवळ दुपारी पावणे दोनच्या बस आली असता महामार्गावरील उतारावर बसचा ब्रेक लागत नसल्याचे चालक विलास जाधव याच्या निदर्शनास आले. उतारावर असल्याने बसचा वेग वाढला. यात पाच चारचाकी वाहनांना तसेच दोन दुचाकींना शिवशाही बसने धडक दिली. त्यानंतर बसचा वेग कमी होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा कठड्यावर धडकून बस थांबली.
बसचे ब्रेक फेल झाल्याचे समजताच बसमधील प्रवाशांमध्ये धडकी भरली. तसेच महामार्गावरील इतर वाहनचालकांचाही गोंधळ उडाला. या अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. एका दुचाकीस्वाराने बावधन चौकीच्या पोलिसांना अपघाताबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्याकडेला घेऊन वाहतूक सुरळीत केली, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक गणेश खर्गे यांनी दिली.