पळसदेव : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर नजीक लोणी देवकर गावच्या हद्दीत एसटी बस आणि मारुती इको कारचा अपघात झाला. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात सोमवारी 1 मे रोजी दुपारी 12 च्या दरम्यान घडला.
लोणी देवकर या ठिकाणी तळेगाव डेपोची बस पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. आणि याच दरम्यान पाठीमागून वेगात आलेल्या मारुती इको कार चालकाने या उभ्या असणाऱ्या बसला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती महामार्गपोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारुती इको कार चालक पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने येत होता. दरम्यान लोणी देवकर गावच्या हद्दीत रस्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटीला कार चालकाने पाठीमागून जोराची धडक देऊन हा अपघात झाला. यात १) गजानन थिटे वय ६५ वर्षे,२) गौरी गजानन थिटे वय ५५ वर्षे,३) नथुराम गजानन थिटे वय ३५ वर्षे, ४) निवेदिता नथुराम थिटे वय २६ वर्षे,५) ऋत्विक नथुराम थिटे वय ४ वर्षे सर्व, ६) ओम वय ०८ वर्षे सर्व रा.बहे ता.रोहा जिल्हा रायगड तर ७) भगवान आबाजी तुपकर वय ६१ वर्षे ८) भारती भगवान तुपकर वय ५० वर्षे सर्व रा. मुठवली खुर्द ता.रोहा जिल्हा रायगड येथील रहिवासी दोन गंभीर जखमी असून इतर किरकोळ जखमी असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान या अपघातानंतर इंदापूर पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांचे सहकारी यांसह इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर बस आगाराचे अधिकारी यांनी अपघात स्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस करत मदतकार्य केले आहे. यावेळी स्थानिक नागरिक अक्षय बाबर, सिध्देश कोकाटे, शैलेश शिरसाट,अर्पन डोंगरे,रवी गायकवाड, गणेश सपकळ आदी मदतीला धावून आले.