पुणे : वानवडी परिसरात माजी वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि.२२) रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. हॉटेल व्यवसायाच्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
वजीर हुसेन शेख, असे जखमी माजी अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी ईशा वजीर शेख (वय ५६, रा. ब्रह्मा आंगण सोसायटी, वानवडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी प्रमोद काकडे याला अटक करण्यात आली आहे.
वजीर शेख यांनी वानवडी परिसरात संविधान चौकात ‘नेचर ॲग्रो टुरिझम’ हे हॉटेल सुरू केले आहे. शुक्रवारी रात्री ते नातेवाइकांसह काकडेबरोबर चर्चा करत होते. यावेळी भाडेकरार केला नाही, तसेच पैसे दिले नाहीत. यामुळे झालेल्या वादात आरोपी काकडे याने वजीर शेख यांच्यावर दगडाने जोरदार हल्ला चढवला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना नातेवाईक आणि कामगारांनी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी प्रमोद काकडे या आरोपीस अटक करण्यात आल्याचे वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी सांगितले. अधिक तपास वानवडी पोलिस ठाण्यातील अधिकारी करीत आहेत.