आळंदी (पुणे) : जुन्या व्यवहाराचे फोनपेद्वारे नजरचुकीने जास्त गेलेले पैसे पुन्हा माघारी मागण्यासाठी गेलेल्या तरुणावर व त्याच्या सहकाऱ्यांवर चाकू व चॉपरच्या साह्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना आळंदीत घडली आहे. रविवारी (दि.६) रात्री आठच्या सुमारास आळंदी हद्दीतील काळे कॉलनी परिसरातील पेट्रोल पंपासमोरच्या मोकळ्या मैदानात ही घटना घडली. या जीवघेण्या हल्ल्यात फिर्यादी वसीम हुसेन शेख (वय २७ रा. चऱ्होली खुर्द), शशिकांत गायकवाड, खंडू लोणकर व अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मित्र शशिकांत गायकवाड यांच्याकडून फोनपेद्वारे राहुल सुरेश चोरडिया याच्याकडे नजरचुकीने जास्त पैसे गेले. त्यामुळे फिर्यादी वसीम शेख, शशिकांत गायकवाड, खंडू लोणकर व अन्य एक जण हे चुकून जास्त आलेले पैसे परत मागण्यासाठी चोरडिया यांच्याकडे आले. मात्र चोरडिया याने शिवीगाळ करत पैसे परत न देण्याची धमकी देत फिर्यादी व शशिकांत गायकवाडच्या भावाच्या (नाव माहीत नाही) छाती व पाठीवर चाकूने वार केले. तसेच त्याचा साथीदार नवाज सय्यद याने फिर्यादीच्या छाती व पोटात चॉपर घुसवला. तर अन्य दोन साथीदारांनी चौघांना लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केली. या जीवघेण्या हल्ल्यात चौघेही गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात नवाज सय्यद, राहुल सुरेश चोरडीया (वय ४४ रा. काळे कॉलनी, आळंदी) व अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी राहुल चोरडिया यास दिघी पोलिसांनी अटक केली आहे.