लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणाला उलट्या कोयत्याने मारहाण करीत विटांनी हल्ला करून गंभीर जखमी केले.
याप्रकरणी अभिषेक लोंढे (वय २८, दुधाणेनगर, कर्वेनगर) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कर्वेनगरमधील सहवास साेसायटीजवळ २ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
स्वप्निल रोहिदास जाधव (वय २२) आणि अभिषेक रोहिदास जाधव (रा. गणेशनगर, एरंडवणे) अशी अटक केलेल्या दोघा गुंडांची नावे आहेत.
अभिषेक आणि त्यांचे मित्र ओंकार कोळी, वैभव गौडी हे श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन दुचाकीवर वारजेतील दुधानेनगर परिसरात चालले होते. त्या वेळी पाठीमागून आलेल्या टोळक्याने त्यांना अडवून शिवीगाळ केली. जुन्या भांडणाच्या रागातून अभिषेकला आरोपींनी त्यांच्या गाडीवर बसवले. राजाराम पुलाजवळ नेऊन त्यांच्यावर उलट्या कोयत्याने वार केला. त्याशिवाय विटांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.