बिबवेवाडी : सॅलिसबरी पार्क येथील नेहरू रस्त्यावरील गिरीधर भवन चौकातील सुयोग सेंटरसमोर रस्त्यावरील खड्डा चुकवताना दुचाकीस्वार (एमएच १२-जेपी ४९४५) संदीप वसंतलाल शहा (वय ४८, रा. गंगाधाम सोसायटी) हे खाली पडले. त्यांच्या मागून येणारा भरधाव ट्रक (एमएच ११-एएल ३९०८) डोक्यावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्या वेळी हा अपघात झाला, त्या वेळी रस्त्यावर अंधार होता. उड्डाणपुलाच्या खांबाचे खोदाईचे काम सुरू असल्यामुळे त्याजागी बॅरिकेड लावलेले आहेत. अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी रस्ता बंद केला होता; त्यामुळे या परिसरात मोठी गर्दी जमली होती. अपघात इतका भयंकर होता, की काही नागरिकांनी मृतदेह चादरीने झाकून ठेवला होता. विशेष म्हणजे, या अपघाताची माहिती अपघातस्थळापासून काही अंतरावरच असलेल्या महर्षीनगर पोलीस चौकीला नागरिकांनी दिली. ट्रकचालक संजय बागल (वय ३१, रा. काळेवाडी, ता. आटपाडी) याला महर्षीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.घरातील कर्ता पुरुष गेलासंदीप शहा यांचे रविवार पेठेत दुकान असून त्यांचा ताडपत्री व दोऱ्यांचा मोठा व्यवसाय आहे. त्यांचे मोठे बंधू व ते हा व्यवसाय एकत्र करीत होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी व दोन मुली असून त्यांतील एका मुलीचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आहे व दुसºया मुलीने १२ वीची परीक्षा दिलेली आहे. तसेच, घरात वृद्ध आई आहेत.१ नेहरू रस्ता हा टिंबर मार्केट आणि मार्केट यार्डला जोडणारा रस्ता असून तेथे जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यातच सॅलिसबरी पार्क येथील नेहरू रस्त्यावर खड्डे पडलेले असून, सेव्हन लव्ह चौक ते वखार महामंडळाच्या चौकापर्यंत उड्डाणपुलाचे काम सध्या जोरात सुरू आहे. गिरीधर भवन चौक ते वखार महामंडळापर्यंतचा रस्ता हा छोट्या टेकडीप्रमाणे असून, सिग्नल सुटल्यावर वाहनांचा वेग जास्त असतो. येथे कुठेही गतिरोधक नसून वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहत नाही.
२ येथील रस्ता आधीच अरूंद असून रस्त्यावर उड्डाणपुलाच्या खांबाच्या कामामुळे व पदपथांच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा तर निर्माण होतोच; परंतु रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे येथील वाहतुकीवर परिणाम होत आहे. रस्त्यावर चालू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे व रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठी कसरत करत वाहने चालवावी लागतात. याच कसरतीत बुधवारी रात्री एका व्यक्तीचा बळी गेला. मागील वर्षीच याच चौकात एका नागरिकाचा एसटी बसच्या खाली येऊन मृत्यू झाला होता. त्यामुळे असलेल्या रस्त्यांची डागडुजी न करता नवीन कामांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, खड्ड्यामुळे नागरिकांचे आणखी किती बळी जाण्याची वाट प्रशासन पाहणार आहे ? असा संप्तत सवाल नागरिक करीत आहे.