- शरद पांडुरंग काळे
sharadkale@gmail.com
----------------
प्रत्येक सजीवाचा पुढचा क्षण अज्ञात असतो. ह्या अज्ञाताचे मानवाला अतिशय आकर्षण असते. आज काय आहे, यापेक्षा उद्या कसे असेल, याबद्दल मनात अधिक उत्सुकता असणे मानवासाठी स्वाभाविक आहे. इतर सजीवांना असे आकर्षण असते की नाही, याबद्दल फारशी माहिती नाही. मानवाने भविष्य जाणण्यासाठी ज्योतिषनिर्मिती केली! माणसाचे माहिती नाही, पण ज्योतिषाचे भवितव्य उज्ज्वल आहे, यात शंका नाही! ललाटरेषा कपाळी असतात असे म्हणतात. कपाळावर आठ्या असतात, हे माहिती असते! हस्तरेषा ह्या भविष्याचे शिलालेख आहेत, हे खरं खोटं ते माहिती नाही! पण प्रत्येकाच्या हातावर रेषा असतात, हे मात्र खरे. पण ज्यांना हात नसतात, त्यांनाही भविष्य असते, हेही तितकेच खरे!
हाथों की लकीरों पर बराबर विश्वास नही करना चाहिए,
तक़दीर तो उनकी भी होती है जिनके हाथ नही होते!
असा एक शेर आहे! असो. हातावरील भाग्यरेषा किती खऱ्या आणि किती खोट्या हे ठाऊक नाही. अन् ते महत्त्वाचेही नाही. पण वनस्पतींच्या पानांवर असलेल्या भाग्यरेषाही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्याविषयी....
पानांवर शिरांचे जे जाळे असते ते प्रत्येक वनस्पतीसाठी वैशिष्ट्यपूर्ण असते. काही पानांमध्ये या शिरा समांतर असतात. मधली मुख्य शिर आणि तिच्या दुतर्फा समांतर (parallel) जाणाऱ्या उपशिरा एखाद्या आखीव रेखीव शहरातील रस्त्यांसारख्या वाटतात! मका, गहू, ज्वारी, बाजरी, केळी यांसारख्या बहुतेक सर्व एकदल वनस्पतींमध्ये या समांतर धावणाऱ्या शिरा पानांवर दिसतात. काही पानांवरील शिरा जाळीदार असतात. कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे शिरांची एक छान जाळीदार (reticulate) रचना आपल्याला या पानांवर दिसते. आंबा, गुलाब, जास्वंद, वड, पिंपळ अशा द्विदल वनस्पतींच्या पानांमध्ये ही शिरांची जाळीदार रचना दिसते. नेचे किंवा फर्न आणि सायकससारख्या जिमनोस्पर्म जातीच्या प्राचीन वनस्पतींमध्ये पानांच्या शिरा, या जेवणासाठी काटे चमचे जिथे वापरले जातात, त्या काट्यांसारखी (furcate or dichotomous) असते. या शिरा म्हणजे पानांचा जीवनरस वाहून देणारी प्रणाली असते. झायलेम आणि फ्लोएम या नावाने वनस्पतिशास्त्रात माहिती असलेल्या उतींनी, या शिरा बनलेल्या असतात. यातील झायलेम ह्या उतींच्या पेशी मृत असतात, त्यांचे काम मुळांनी शोषलेल्या पाण्याची वाहतूक करणे हे असते. तर फ्लोएम उतींच्या पेशी मात्र जिवंत असतात आणि पानांनी तयार केलेले अन्न वनस्पतींच्या विविध भागांना पुरविणे, हे त्यांचे काम असते. त्याशिवाय पानांना आधार देणे हे देखील या शिरांचे अतिशय महत्त्वाचे कार्य आहे. हा पानांचा सांगाडा असतो, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. पिंपळासारख्या एखाद्या झाडाचे पान पुस्तकात ठेवून काही महिन्यांनी किंवा वर्षांनीसुद्धा त्याची जी जाळी बनते, ती विलक्षण सुंदर दिसते. एकूणच पानांवरील शिरांची नक्षी म्हणजे निसर्गाच्या कलाकुसरीचे उत्तम नमुने म्हणता येईल. अर्थात निसर्गाची ही कलाकुसर वनस्पतींच्या उत्क्रांतीशी संबंधित आहे.
पानांवरील ह्या शिरांची रचना आणि उत्क्रांती यातील संबंध मनोरंजक आहे. अगदी प्राचीन इतिहासात जेव्हा वनस्पती या विकसित होत होत्या, त्या वेळी वनस्पतींची विभागणी पाने, खोड, फुले, फळे, बीज अशा विविध अवयवांमध्ये झाली नव्हती. पुरातन काळातील शैवाल आणि मॉसेस या वनस्पतींमध्ये आजदेखील अशी विभागणी आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे पाण्याची आणि अन्नरसाची वाहतूक करण्यासाठी झायलेम आणि फ्लोएम यासारख्या विशिष्ट उतींचे देखील नियोजन त्यांच्या शरीररचनेत नव्हते. मॉसेसमध्ये प्रथम या अन्नपाण्याच्या चलनवलनासाठी काही छोट्या नलिका विकसित झाल्या. साधारण ३२ कोटी वर्षांपूर्वी मध्य कार्बनी युगात पाने आणि खोड यांचा विकास होऊ लागला. लायकोफाईटस नावाच्या वनस्पतींमध्ये एक संवहनी (vascular) प्रणाली निर्माण झाली, आणि तिचेच पुढे विविध उतींमध्ये रूपांतर होत गेले. जसजसे खोडातून फांद्या विकसित झाल्या, तसतसे ह्या संवहनी प्रणालीचे देखील उत्क्रांत स्वरूपात रूपांतर होत जाऊन शिरांची जाळी निर्माण झाली.
वनस्पतिशास्त्रात आता या शिरांच्या जाळ्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. याबाबत खालीलप्रमाणे महत्त्वाचे मुद्दे असे सांगता येतील.
१. पानांमधील शिरांचे जाळे पाणी, अन्न, पोषक द्रव्ये (क्षार) आणि जीवनावश्यक रसायने (संप्रेरके, प्रतिद्रव्ये इत्यादी) यांच्या चलनवलनासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. ह्या जाळ्यांची लिपी ही आनुवंशिक तत्त्वात लिहिलेली असते. तिचे प्रत्यक्ष स्वरूप आपल्याला पानांमध्ये दिसते.
२. सपुष्प वनस्पती वर्गात (angiosperms) जी प्राथमिक आणि दुय्यम स्वरूपातील शिरांची जाळी दिसतात, त्या सर्वांचे मूळ एकच वाहतूक प्रणाली असते, पण काम एकात्मिक स्वरूपाचे नसते. तसेच त्यांचे वैयक्तिक मूळ देखील वेगवेगळे असते. म्हणजे झायलेम आणि फ्लोएममध्ये मूलतः वेगळेपण असते. त्यांचे आनुवंशिक मूळ देखील वेगवेगळे असते.
३. विविध आनुवंशिक, रचना आणि शरीरशास्त्रीय शिरांची जाळी एकत्र येऊन त्यांची उत्क्रांती होत जाते. त्यावर त्या वनस्पतींची पर्यावरणातील स्थिरता आणि उत्क्रांती अवलंबून असते.
४. सपुष्प वनस्पतींमध्ये निश्चित स्वरूपात शिरांची जाळी असतातच. त्यात परिस्थितीनुसार बदल होत नाहीत.
५. पानांमधील वैशिष्ट्यपूर्ण शिरांची रचना उत्क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, आणि सर्व जगातील वनस्पतींमध्ये हवामान बदलाशी जमवून घेण्यासाठीसुद्धा त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
--------------
(लेखक भाभा अणुसंशोधन केंद्राचे पद्मश्री पुरस्कारप्राप्त निवृत्त वैज्ञानिक आहेत.)