बारामती : बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडीत निवडणूक लागल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे भाजपा व रासप पुरस्कृत पॅनल सत्ताधा-यांच्या विरोधात उभा आहे. सरपंच पदासाठी तीन जण स्पर्धेत असून यात एक तृतीय पंथीयाचा समावेश आहे. या निवडणुकीत भाजपाबरोबर रासपने उडी घेतल्याने जाीय समीकरंडही महत्वाची ठरणार आहेत. राज्याच्या राजकारणावर प्रभाव असणा-या नेत्याच्या गावातच ही निवडणूक होत असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
काटेवाडीत गेल्यावेळी निवडणूक बिनविरोध झाली होती. सरपंचपद महिलेसाठी राखीव असल्याने सुनित्रा पवार यांनी ती निवडणूक बिनविरोध केली होती. यावर्षी मात्र सरपंचपद थेट जनतेतून व सर्वसधारण गटासाठी असल्याने निवडणुकीत चुरश निर्माण झाली आहे. राज्यात व केंद्रात भाजपा सत्तेत असल्याने येथील भाजपा कार्यकर्त्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपले पॅनल रिंगणात उतरवले आहे. त्यात अजित पवार यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विशेष प्रयत्न न केल्याने निवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीचे भवानीमाता पॅनल व भाजपा व रासपचे लोकशाही ग्रामविकास पॅनलमध्ये ही लढत होत असली तरी सरपंचपदासाठी तिहेरी लढत होत आहे. सुनिता गायकवाड या तृतीय पंथीयाने सरपंचपदासाठी व वार्ड क्रमांक ३ मधून सदस्यपदासाठी रिंगनात आहे. संरपचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
विरोधकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी निवडणूक लादली
राष्ट्रवादीचा भवानीमाता पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार विद्याधर काटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की काही जणांनी स्वत:च्या स्वार्थासाठी निवडणूक लादली आहे. काटेवाडीचा परिपूर्ण विकास झाला आहे. काटेवाडीला राज्यात निर्मलग्राम पुरस्कार मिळाला आहे. त्यावरूनच गावातील विकासकामांचा अंदाज करणे शक्य आहे. गावातील संपूर्ण विकासकामे पूर्ण आहेत. तरीदेखील विरोधक बिनबुडाचे आरोप करतात. त्यामुळे जनतेतून विरोधकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव दिला नाही. विरोधकांनी केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी निवडणूक लादली आहे. शिवसेनेनेदेखील राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे.
हस्तकांमार्फत बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न झाला...
लोकशाही ग्रामविकास पॅनलचे प्रमुख, सरपंचपदाचे उमेदवार पांडुरंग कचरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की बिनविरोध निवडणुकीमुळे एक प्रकारे लोकशाहीचा खूनच होतो. दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे तंत्र विरोधक राबवितात. निवडणुकीमुळे प्रस्थापितांना सर्वसामान्यांच्या दारात जावे लागले. हेच आमच्या पॅनलचे घोषवाक्य आहे. काटेवाडीची भरभराट झाल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात दीपनगर, मासाळवाडी भागात स्मशानभूमी नाही. पिण्याच्या पाण्याची सोयदेखील नाही. रस्त्याचे नामोनिशाण नाही. प्रस्थापितांनी त्यांच्या हस्तकांमार्फत बिनविरोध निवडणुक ीचा प्रस्ताव देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रस्ताव आम्ही स्वीकारला नाही. बिनविरोध निवडणुकीला संमती दिल्यास केवळ १ ते २ जागांवर बोळवण करून चेष्टा केली जाते.