शिक्रापूर (पुणे) : टाकळी भीमा (ता. शिरुर) येथून १ मार्च रोजी हरवलेली अकरा वर्षीय लहान मुलगी शिक्रापूर पोलिसांना सतर्कतेमुळे पालकांच्या स्वाधीन करण्यास यश आले आहे. दरम्यान, मुलीची भेट घडल्याने पालक व ग्रामस्थांनी पोलिसांचे कौतुक करत पोलिसांचा सन्मान केला.
टाकळी भीमा येथील चांदणी यादव ही ११ वर्षीय मुलगी १ मार्च रोजी गावात दळण आणण्यासाठी गेली होती; मात्र उशीर झाल्याने वडील रागावतील या भीतीने ती गावातून निघून गेली होती. दुसऱ्या दिवशी देखील चांदणीचा तपास न लागल्याने चांदणीचे वडील संदीप बनारसी यादव (वय ३२, रा. टाकळी भीमा ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दाखल केली.
सदर घटनेबाबत शिक्रापूर पोलिस या लहान बालिकेचा शोध घेत असताना चांदणी तळेगाव ढमढेरे परिसरात असल्याची माहिती सहायक पोलिस उपनिरीक्षक विकास कुंभार यांना मिळाली. त्यानंतर विकास कुंभार, मयूर कुंभार, अमोल नलगे यांनी सदर ठिकाणी जात गणेश लवांडे या युवकांच्या मदतीने बालिकेला शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे आणून तिच्या वडिलांना याबाबत माहिती देऊन बोलावून घेतले.
दरम्यान, आपल्या मुलीला पाहून तिच्या वडिलांना गहिवरुन आले. बालिकेचा शोध घेण्यात पोलिस यशस्वी झाल्याने टाकळी भीमा ग्रामस्थांच्या वतीने पोलिस पाटील प्रकाश करपे, पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे यांच्या हस्ते सहायक पोलिस उपनिरीक्षक विकास कुंभार, मयूर कुंभार, अमोल नलगे यांचा सन्मान करण्यात आला.