डोर्लेवाडी (पुणे) : बारामती-वालचंदनगर मार्गावर दुचाकी व हायवा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बापलेकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. २९) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोनगाव (ता. बारामती) येथे घडली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश रामदास पवार (वय-३८) व त्यांचा मुलगा आर्यन सतीश पवार (वय- १२ रा. दोघेही आसू ता. फलटण जि. सातारा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या बापलेकाची नावे आहेत. स्थानिक नागरिकांनी मिळालेल्या माहितीनुसार, सतीश पवार व त्यांचा मुलगा हा बारामती-वालचंदनगर मार्गावर दुचाकीवरून घरातून बारामतीकडे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. यावेळी मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हायवाने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली.
यावेळी झालेल्या अपघातात वडील सतीश पवार यांचे जागेवरच निधन झाले. तर आर्यन याच्या डोक्याला मोठ्या प्रामाणात जखमा झाल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ एका खाजगी रुगणालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बारामती ग्रामीण पोलीस दाखल झाले आहेत. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश पवार तपास करीत आहेत.
दरम्यान, अशाच पद्धतीच्या हायवाने मागील महिन्यात २९ जुलैला लहान मुलाला चिरडल्याची घटना सोनगाव (ता. बारामती) घडली होती. परिसरात मोठ्या प्रमाणात मुरूम, वाळू उपसा होत असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये आहे. महसूल प्रशासन व पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थनिक नागरिक करीत लागले आहेत. त्यामुळे अशा हायवा चालकांवर पोलीस व महसूल प्रशासन काय कारवाई करतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
रोडवर गतिरोधक टाकण्याची वारंवार मागणी-बारामती वालचंदनगर रस्त्याचे काहि दिवसांपूर्वी काम पूर्ण झाले आहे. यामुळे या मागावर वेगाने वाहने जातात. परिणामी अनेक वेळा अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहेत. या मार्गावर गतिरोधक टाकण्याची मागणी सोनगाव, झारगडवाडी, डोर्लेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने अनेक वेळा करण्यात आली आहे. संबंधित रस्त्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार देखील करण्यात आले आहेत.
....संबंधित बांधकाम अधिकारी,रस्त्याच्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-
जाणीवपूर्वक अधिकारी गतिरोधक बसवण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत, यामुळेच वारंवार अपघात घडत आहे. याला सर्वस्वी संबंधित बांधकाम अधिकारी आणि या रस्त्याचे ठेकेदार जबाबदार असून त्यांच्यावरच आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी झारगडवाडीचे सरपंच अजित बोरकर यांनी केली आहे.