पवनानगर - घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन करताना, वडील व मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. दोन्ही मृतदेह सापडले आहे. ही घटना गुरुवारी (दि.१२) सायंकाळी ५ वाजता कडधे गावाच्या हद्दीत घडली असून दोन्ही मृत व्यक्ती बेडसे गावातील रहिवासी होते.
संजय धोंडू शिर्के (वय.४५) व हर्षल संजय शिर्के (वय.२२) (दोघेही रा.बेडसे तालुका मावळ) असे मृत पिता-पुत्रांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कडधे हद्दीतील संजय शिर्के व हर्षल शिर्के घरातील गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी घराजवळील माळावर उत्खनन केलेल्या जागेत साचलेल्या पाण्यात गेले असता, मुलगा हर्षल शिर्के बुडत असताना, त्याचे वडील संजय शिर्के यांनी पाण्यात उडी घेतली आणि दोघेही पाण्यात बुडाले.कामशेत पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. वन्यजीव रक्षक मावळ संस्था व शिवदुर्ग मित्र लोणावळा निलेश गराडे,रमेश कुंभार, शत्रुघ्न रासनकर,ओंकार कालेकर ,संतोष दहिभाते, शुभम काकडे यांच्या सह ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी मृतदेह बाहेर काढले.
दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगांव येथे नेण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास कामशेत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनील पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र दिक्षित,अनिल हपरकर,अमोल ननवरे,रवींद्र रावल हे करत आहे.