पुणे : पुण्यातील चाकण भागात गरबा प्रशिक्षक म्हणून काम पाहणाऱ्या अशोक माळी यांचा गरबा खेळताना दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या मुलासोबत गरबा खेळताना त्यांना अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले. उपस्थितांनी त्यांना तातडीने उचलून रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
नवरात्रीच्या या दिवसात देशभरात दांडिया, गरबा खेळण्याचे उत्साही वातावरण आहे. मात्र या आनंदाच्या वातावरणात माळी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गोलाकार गरबा खेळत असताना अचानक अशोक माळी खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. दांडियाच्या तालावर लयबद्ध अदाकारी करत त्यांनी उपस्थितांची मन जिंकली होती. मात्र त्यानंतर काही वेळातच ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. संबंधित घटनेचा व्हिडीओ मनाला चटका लावून जाणारा आहे. लहान मुलाच्या डोळ्यासमोरच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घुंगट मे चाँद होगा आखो मे सजनी... या गाण्यावर अतिशय आनंदमय वातावरणात माळी गरबा खेळत होते. नाचताना त्यांची पाऊलही चुकत नव्हती. मुलगाही त्यांच्याप्रमाणेच आनंद घेत खेळत होता. अचानक ते चक्कर येऊन खाली कोसळले. आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. जमीनीवर कोसळले त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आलं. अशोक माळी हे मूळचे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील होळ गावाचे रहिवासी आहेत. अशोक माळी यांचा गरबा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असे.
बदलत्या जीवनशैलीने हार्ट अटॅकचे प्रमाण वाढू लागले आहे. १५, १६ वर्षांच्या मुलांचाही हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आज कालच्या तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढू लागले आहे. हार्ट अटॅकची मुख्य कारणे तणाव आणि आहार आहेत. तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल अटॅक येऊ शकतो असे डॉक्टरांनी सांगितले आहे.