धनकवडी : धनकवडी येथील ग्रामदेवता जानु बाई माता यात्रेच्या निमित्ताने डीजे साऊंड ची वाहतूक करणाऱ्या टेंम्पोचा ब्रेक उतारावर निकामी होऊन झालेल्या अपघातात सनी ढावरे या सोळा वर्षीय मुलाचा नाहक जीव गेला. उपचाराला जाण्यासाठी झालेली दिरंगाई आणि पैशाअभावी उपचारात झालेली हेळसांड मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. या दुर्दैवी घटने बद्दल धनकवडीत हळहळ व्यक्त होत आहे.
कोणाची हौस कोणाच्या जीवावर बेतेल याचा नेम नाही. यात्रेत धमाका करण्यासाठी डीजेची लगबग सुरू होती. डीजे साऊंडच्या साहित्याची वाहतूक करणारा टेंपो सावरकर चौकातून उताराने शेवटच्या बस थांब्याच्या दिशेने जात असता ना त्याचा ब्रेक फेल झाला आणि अपघात झाला. या अपघातात सनी ढावरे याला धडक बसली मात्र तो चाकाखाली जाता जाता थोडक्यात बचावला. त्याचावर वेळ आली होती मात्र काळ आला नव्हता अशी स्थिती होती.
सुरूवातील सनीला जास्त लागल्याची जाणीव झाली नाही. मात्र काही वेळाने डोकं दुखू लागल्याचे जाणवताच खासगी दवाखान्यात नेण्यात आले. बाब गंभीर असल्याचे लक्षात येता मोठ्या रूग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. एमआरआय साठी लागणारी रक्कम नसल्यामुळे मोठ्या रूग्णालयातही मुलाच्या उपचारास दिरंगाई झाली. या गोंधळात सनीचा मृत्यू झाला आणि त्याच्या आईने एकच हंबरडा फोडला.
हाताशी आलेल्या मुलाच्या मृत्यूने माऊली पुरती तुटून गेली. सनी एक वर्षाचा असतानाच त्याच्या वडीलांचे निधन झाले होते. तेंव्हापासून लोकांची धुणीभांडी करून या माऊलीने सनीसह आपली आई आणि सासूला सांभाळत आली आहे. मुलगा हाताशी आल्यामुळं थोडा हातभार लागतोय तोच त्याच्यावर काळाचा घाला झाला. महागड्या उपचारासाठी पैसेच नसल्यामुळे सनीचा हक नाक बळी गेल्याचे समझताच परिसरात सर्वत्र हळ हळ व्यक्त झाली.