पांडुरंग मरगजे
धनकवडी : वडील हमालीचे तर आई घर काम करणारी... त्यामुळे परिस्थिती अत्यंत बेताची. मात्र या परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यशाला गवसणी घालत धनकवडी, बालाजीनगर येथील सत्यनारायण गव्हाणे ने उत्तुंग यश संपादन केले आहे. आई वडिलांनी अर्धपोटी राहून मुलांना त्यांच्या यशापर्यंत पोहचवले. या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे सत्यनारायणच्या आई वडिलांनी सांगत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
कृष्णा गव्हाणे यांचे मूळ गाव परभणी जिल्ह्यातील सेलू असून उपजिविका करण्यासाठी ते पुण्यात दाखल झाले, मात्र शहरातील तुटपुंज्या उत्पन्नावर कुटुंबाची उपजीविका भागविणे आणि मुलांचे शिक्षण पूर्ण करणे हा मोठा आर्थिक पेच प्रसंग वडील कृष्णा उत्तमराव गव्हाणे आणि आई सविता कृष्णा गव्हाणे यांच्यापुढे होता. मात्र मुलांचे शिक्षण पुर्ण झाले पाहिजे ही खुणगाठ मनाशी त्यांनी बाळगली होती.
“माझ्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले. त्यांनी मला सतत प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले. नियमित एकाग्रतेने वाचन, सराव आणि अभ्यास केला. निकाल समजला. मी पास झाल्याचे ऐकून आई आणि बाबांच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू पाहून माझे हृदय हेलावून गेले. विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी आईवडिलांची अपार मेहनत सतत डोळ्यासमोर ठेऊन नियमित अभ्यास करावा. यश नक्कीच मिळते. असा माझा अनुभव असल्याचे त्याने सांगितले.
सत्यनारायण हा धनकवडीतील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदीर व ज्युनिअर कॉलेज मध्ये शिकत असून बहिण सातवी मध्ये तर लहान भाऊ पाचवी मध्ये शिकत आहे.
आजही नाही स्वतः चं घर
घरची परिस्थिती अत्यंत बेताची. त्यातच शिक्षणाचा खर्च. त्यामुळे आजपर्यंत त्यांना हक्काचा निवारा म्हणून स्वतः चं साधं घर हि घेता आलं नाही, त्यामुळे मुलगा शिकून मोठा होईल आणि स्वतः चं घर घेईल या स्वप्नातच कुटुंबातील सदस्यांनी आनंदोत्सव भाड्याने घेतलेल्या खोलीत साजरा केला.