न्हावरे (ता.शिरूर) : जन्मदात्यानेच संशयापोटी आपल्या ७ महिन्यांच्या मुलीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना कुरुळी (ता. शिरूर) येथे शुक्रवारी घडली. मुलीचा खून करून ती बेपत्ता असल्याचा बनाव करणा-या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. कौशल्या भुरा धुळकर (वय ७ महिने) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. तिचा पिता भुरा शंकर धुळकर (वय ३०, रा. जळगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुरा धुळकर व त्याची पत्नी अरुणा भुरा धुळकर हे केडगाव (ता. दौंड) येथील एका गु-हाळासाठी कुरुळी येथे ऊसतोडणीचे काम करत होते. भुरा धुळकर यास ४ वर्षांचा एक मुलगा व ७ महिन्यांची एक मुलगी होती. कौशल्या गुरुवारी रात्री आपल्या आईवडिलांसमवेत झोपली होती. दरम्यान शुक्रवारी सकाळी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी भुरा धुळकर मांडवगण फराटा येथील पोलीस दूरक्षेत्र केंद्रात आला होता. त्याची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली. दरम्यान धुळकर याची तक्रार नोंदवून घेत असतानाच आंधळगावच्या शिवारातील एका विहिरीत सात महिन्यांच्या मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आलेल्या मुलीचा असल्याचे निदर्शनास आले. भांडने झाल्याने भुराची बायको काही दिवस माहेरी होती. त्यामुळे मृत कौशल्या ही त्याची मुलगी नसल्याचा संशय भुराला होता.या संशयापोटी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुलीला झोपेतून उठून स्वत:जवळ असणा-या धारदार शस्त्राने त्यांच्या पोटचा गोळा असलेल्या चिमुकलीचा गळा कापून त्याने खून केला. यावेळी पत्नीने मुलीला मारू नका, अशी गयावया केली. मात्र तिला झिडकारून देऊन तुलाही मारून टाकेल, अशी धमकी देऊन मुलीचा मृतदेह आंधळगाव येथील विहिरीत आरोपीने फेकून दिला. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे करत आहेत.पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली-मुलीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी कौशल्याच्या वडिलांना ताब्यात घेऊन त्यास माहिती विचारली असता त्याच्या बोलण्यात विसंगती आढळली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला.
पुणे : स्वतः ची मुलगी नसल्याचा संशय, जन्मदात्यानेच केला सात महिन्याच्या चिमुकलीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2018 7:44 AM