पुणे : सासू, सून यांच्या भांडणे होत असल्याने सासूरवाडीतील लोकांना समजावून सांगण्यासाठी बोलावणे जावयाला महागात पडले. सासरा, सासू आणि मेहुण्याने जावयालाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी कोंढव्यातील एका ४३ वर्षांच्या जावयाने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी ज्येष्ठ नागरिक असलेले सासू, सासरे व दोघा मेहुण्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोंढव्यातील साईबाबानगर येथे ३ जूनला दुपारी घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मोमीनपुरा येथे सासूरवाडी आहे. ते, त्यांची पत्नी आणि फिर्यादीची आई यांची भांडणे होत असत. आपल्या पत्नीला समजावून सांगावे, यासाठी फिर्यादी याने सासू, सासरे व मेहुणे यांना फोन करून बोलावून घेतले. त्यानुसार फिर्यादीच्या सासूरवाडीतील चौघे जण आले. गुरुवारी दुपारी त्यांच्यात चर्चा सुरू होती. या वेळी चर्चेचे रूपांतर वादात झाले. त्यातून सासरे, मेहुणे यांनी लोखंडी रॉडने फिर्यादीला मारहाण केली. तसेच त्यांच्या आईला शिवीगाळ करून ढकलून दिले. कोंढवा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गपाट अधिक तपास करीत आहेत.