सासवड: सासवड शहरातील व पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध ठिकाणच्या आठवडे बाजारात होणाऱ्या गर्दीचे प्रमाण वाढले आहे .विविध ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे कोरणा संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता वाढत चालल्याने बाजारावर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे. पुरंदर तालुक्यात सोमवारी तब्बल ६५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सासवड ग्रामीण रुग्णालयात एकूण १०९ रुग्णांचे स्वॅबपैकी ४२ रुग्ण पाॅझिटिव्ह आले असून, यात सासवडचे २३ रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागातील चौदा गावांमधून १५ रुग्ण असून पुरंदर तालुक्याबाहेरील ४ रुग्ण आहेत. जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दि.२२ मार्च रोजी घेतलेल्या ४९ स्वॅबपैकी २३ रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यामध्ये जेजुरी १४, कोळविहरे १,साकुर्डे २,दौंडज ३ ,भोसलेवाडी १,नाझरे क.प १,तक्रारवाडी १ असे तालुक्यात ६५ रुग्णांची भर पडली आहे.
सासवडसह पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागात आठवडे बाजार भरविले जातात .टाळेबंदीच्या काळात हे बाजार बंद ठेवण्यात आले होते .याचा मोठा परिणाम हे फेरीवाले ,छोटे-मोठे विक्रेते यांच्यावर झाला होता .कोरोना चा प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा शहरी व ग्रामीण भागात आठवडे बाजार भरण्यास सुरुवात झाली .परंतु मागील महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आणि प्रशासनाने कडक निर्बंध लागू करून कारवाईला सुरुवात केली असली, तरी आठवडे बाजारात मोठी गर्दी जमत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आठवडे बाजारात साधारणपणे हजारोंच्या संख्येने नागरिक एकत्र येत आहे.त्यात काही नागरिक मुखपट्टीविना फिरतात तर दुसरे शारीरिक अंतराचे नियमही पाळले जात नाही .त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढत चालली आहे. अशातच सासवड , जेजुरी ,नीरा येथील रुग्ण वाढत असल्याने देखील चिंता व्यक्त केली जात आहे. संध्याकाळच्या सुमारास ही सोपाननगर परिसरात खुल्या जागेत बाजार भरविले जात आहे त्या ठिकाणी ही मोठी झुंबड होत असते.