आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करून तब्बल १०७ पदकं जिंकली. लक्षणीय बाब म्हणजे भारताच्या दोन्ही पुरूष आणि महिला कबड्डी संघाला सुवर्ण पदक जिंकण्यात यश आलं. भारताच्या मुलींनी महिला कबड्डीमध्ये चिनी तैपेईचा २६-२४ असा रोमहर्षक अंतिम सामन्यात पराभव करून सुवर्ण पदक जिंकले. चीनच्या धरतीवर तिंरग्याची शान वाढवल्यानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतत आहेत. मराठमोळी स्नेहल शिंदे भारताच्या महिला कबड्डी संघाची सदस्य आहे. मूळची पुण्याची असलेल्या स्नेहलला पुणे विमानतळावर भेटताच तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. स्नेहलने वडील प्रदीप शिंदेंना सुवर्ण पदक दाखवताच त्यांना आनंदाअश्रू आले.
यावेळी स्नेहलने सांगितले की, मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत आम्ही रौप्य पदक जिंकले होते. त्यामुळे यंदा सुवर्ण जिंकण्याची आमच्यावर मोठी जबाबदारी होती. मागच्या एक वर्षात आम्ही खूप मेहनत केली आणि त्याचे फळ आता सुवर्ण पदकाच्या रूपात मिळाले. मी सुवर्ण जिंकावं हे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. २०१४ मध्ये मी दुखापतीमुळे संघाबाहेर झाली होती आणि २०१८ मध्ये देखील हेच झालं. त्यामुळे या पदकाने मला खूप आनंद झाला.
"खरं तर २० वर्षांपासून आम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होतो, ज्या स्वप्नासाठी झटत होतो, तो क्षण आज आल्याने आम्हाला रडू कोसळलं. ती इयत्ता आठवीत असल्यापासून कबड्डी खेळत होती. आमच्या घरी पदक आल्यामुळे मी खूप खुश आहे", असे स्नेहलचा भाऊ प्रदीप शिंदेने सांगितलं. दरम्यान, भारतीय कबड्डी संघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी भारतातून १२ महिला कबड्डीपटूंची अंतिम निवड झाली होती. या खेळाडूंमध्ये महाराष्ट्रातून एकमेव स्नेहल शिंदेला संधी मिळाली. स्नेहल विवाहित असून तिच्या सासरच्यांनी देखील तिचे स्वप्न साकार करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. आतापर्यंत स्नेहलने चार वेळा कबड्डी संघामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करून सुवर्ण जिंकले आहे.